इमारतीच्या सुरक्षा रक्षकानेच घरात घुसून चोरी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी जुहू येथे घडली. विलेपार्ले पश्चिमेच्या कैफी आझमी पार्कसमोरील कुलब्रीज इमारतीत सोनल शहा (वय ४६) राहतात. त्याच इमारतीचा सुरक्षा रक्षक लालबहादूर सूद बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास दोन साथीदारांसह त्यांच्या घरात घुसला. तिघांनी सोनल शहा यांना मारहाण केली आणि घरातील रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाखांचा ऐवज लुटून पळ काढला. जुहू पोलीस या त्रिकूटाचा शोध घेत आहे.
सोन्याची तस्करी करणारा अटकेत
सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करण्यासाठी बुधवारी सकाळी गल्फ एअरने मुंबई विमानतळावर उतरलेल्या मोहम्मद राणा या २२ वर्षीय पॅलेस्टिनी तरुणाला सीमा शुल्क विभागाने अटक केली. तो अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. संशयावरून त्याची तपासणी केली असता त्याने दडवून ठेवलेली ही बिस्किटे आढळली. १० किलो वजनाच्या या बिस्किटांची किमंत साडेतीन कोटी रुपये आहे.