एखाद्या स्थानकात रेल्वे अपघात किंवा घातपात झाल्यास लोकल गाडय़ांची सेवा ठप्प होते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनाही घटनास्थळी त्वरित पोहोचता येत नाही. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तात्काळ घटनास्थळी पोहोचता यावे यासाठी २२ ‘बुलेट’ दुचाकी देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून देण्यात आली. गस्ती पथकातील जवानांसाठी या बुलेट असणार आहेत.

मध्य रेल्वेचा पसारा सीएसएमटी ते कर्जत, खापोली, कसारा आणि पनवेलपर्यंत आहे. या मार्गावर रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही तैनात असतात. जवानांची संख्या जवळपास दोन हजारापर्यंत आहे. जवळपास ४० लाखांहून अधिक प्रवासी संख्या पाहिल्यास रेल्वे सुरक्षा दलाची सुरक्षा तोकडीच पडते. त्यामुळे मध्य रेल्वे सुरक्षा दलाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जवानांचीही मदत घेतली आहे. या जवानांना गर्दी नियंत्रणाबरोबरच महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीही देण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात रेल्वेमार्ग आणि प्रवासी संख्या पाहता सुरक्षा दलाच्या जवानांकडे मनुष्यबळाबरोबरच प्रवाशांना तात्काळ मदतीसाठी पुरेसे साधनही नाही. एखादा अपघात किंवा घातपात झाल्यास रेल्वेसेवा ठप्प होते. त्या वेळी प्रवाशांना मदत पोहोचवताही येणेही शक्य होत नाही. हे पाहता किमान रस्ते मार्गे तरी जाऊन जवान मदतकार्य करू शकतो. यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना २२ बुलेट दुचाकी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली तसेच शिवडी, गोवंडी, वाशी यासह आणखी काही स्थानकातील सुरक्षा दलाच्या जवानांना बुलेट देण्याचे नियोजन आहे. मध्य रेल्वेवर एकूण ५५ बुलेटपैकी मुंबई विभागात २२ बुलेट देण्यात येतील. सध्या ही दुचाकी सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. त्याचे जवानांना वाटप होणे बाकी आहे. या संदर्भात मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी रेल्वेसेवा ठप्प झाल्यास सुरक्षा दलाचा जवानाला मदतकार्य पोहोचविता येत नाही. त्यासाठी जवानांना ‘बुलेट’सारखी दुचाकी देण्याचे नियोजन होते. त्यामुळे तात्काळ रस्तेमार्गेही पुढील स्थानक जवान गाठू शकतो. त्यामुळे सुरक्षा जवानांना फायदा होऊ शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.