25 February 2020

News Flash

बुलेट ट्रेनला हायपरलूपचा पर्याय

जूनमध्ये कॅलिफोर्नियात पहिली चाचणी

‘आयआयटी टेकफेस्ट’मध्ये सादरीकरण; जूनमध्ये कॅलिफोर्नियात पहिली चाचणी

मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद होण्यासाठी ३५० किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन लवकरच भारतात येणार आहे. पण या तंत्रज्ञानाला आव्हान देणारे आणि बुलेट ट्रेनपेक्षाही जलद प्रवास करणारी ‘हायपरलूप’ येत्या काळात भारतात दाखल करण्याचे स्वप्न वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी पाहिले असून ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर ही वाहतूक व्यवस्था अस्तित्वात आली तर अवघ्या ३५ मिनिटांत मुंबई ते बंगळुरू प्रवास शक्य होणार आहे.

मुंबई तसेच देशातील वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे व्हावी या उद्देशाने रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई वाहतुकीनंतर आता उन्नत मार्गाचा विचार सुरू झाला आहे. पण याही पुढे जाऊन आता सर्वात जलद अशा ‘हायपरलूप’ वाहतूक व्यवस्थेचा विचार सुरू झाला आहे.

एलन मुस्क यांनी २०१३ मध्ये ‘हायपरलूप’ची संकल्पना मांडली आणि या संकल्पनेचा विकास करण्यासाठी ती सर्वासाठी खुली केली. ही संकल्पना भारतात कशा प्रकारे राबविता येईल यासाठी पिलानी येथील ‘बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील सिबेश कर याने ‘हायपरलूप इंडिया’ नावाचा एक ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करणाऱ्या समूहाची स्थापना केली आणि या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना इंडियन बिझनेस स्कूल आणि आयआयएम अहमदाबाद यांनी सहकार्य केले. तसेच निति आयोग आणि डीपी वर्ल्ड इंडियानेही या संकल्पनेवर काम करण्यासाठी संस्थेला प्रोत्साहन दिले आहे. या प्रकल्पाची माहिती आयआयटीमध्ये सुरू असलेल्या तंत्र महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

काय आहे हायपरलूप?

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी रस्त्याच्या लगत किंवा रस्त्यापेक्षा उंच तसेच अगदी समुद्रातूनही मोठय़ा वाहिन्या उभ्या केल्या जातात. या वाहिन्यांमधून ओर्का पॉड नावाचे वाहन प्रवास करते. एखाद्या मोठय़ा कॅप्सूलच्या आकाराचे हे वाहन असून ते अंतराळ यानाच्या तंत्रज्ञानानुसार प्रवास करणार आहे. यामुळे याचा वेग १२०० किमी प्रति तास इतका असणार आहे. भारतीय बनावटीची ही कॅप्सूल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून ती फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणार आहे. तर येत्या जून महिन्यात कॅलिफोर्निया येथे त्याची पहिली चाचणी घेतली जाणार असल्याचे सिबेशने स्पष्ट केले. या प्रकल्पात विद्यार्थ्यांना आणि विविध संबंधित प्राधिकरणांना सहभागी होता येणार असून भारत सरकारनेही याला पाठिंबा दिल्याचे त्याने सांगितले.

First Published on December 17, 2016 2:13 am

Web Title: bullet train and hyperloop 2
Next Stories
1 राज्य कर्जाच्या सापळ्यात?
2 व्हिवा लाउंजच्या पुढच्या पर्वात ‘इस्रो’मधील वैज्ञानिक
3 ‘अभिमत’च्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काला कात्री
Just Now!
X