मुंबई : प्रस्तावित मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन गर्दीच्या वेळेमध्ये दर 20 मिनिटांनी धावणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएचएसआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. गर्दीच्या वेळेस या मार्गावर तीन बुलेट ट्रेन धावतील तर उर्वरित वेळेमध्ये दोन ट्रेन धावण्याचा प्रस्ताव आहे. ताशी 320 किलोमीटर वेगाने धावणारी बुलेट साधारण दोन तासात मुंबई-अहमदाबाद हे अंतर पार करेल. सध्याच्या सामान्य ट्रेनने हे अंतर पार करण्यास 7 तास तर विमानाने एक तास वेळ लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर रोज 70 फे-या मारेल. गर्दीच्या वेळी (सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत) तीन बुलेट ट्रेन धावतील असा प्रस्ताव आहे, तर गर्दी नसताना दोन बुलेट ट्रेन धावतील असं खरे म्हणाले.

या मार्गावर 12 स्थानकं असतील – बीकेसी, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलीमोरा, सूरत, भरूच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद.

एनएचएसआरसीएल हाय स्पीड आणि स्लो अशा दोन ट्रेन चालवणार आहे. हाय स्पीड ट्रेन मुंबई, सूरत, बडोदा आणि अहमदाबाद या स्थानकांवर थांबेल तर स्लो ट्रेन या मार्गावरील 12 स्थानकांवर थांबेल.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर दररोज विमानाने जवळपास 4 हजार 700 लोक प्रवास करतात, तर 500 प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. याशिवाय जवळपास 15 हजार जण कारचा वापर करतात. दोन्ही शहरांमध्ये बुलेट ट्रेनच्या सहाय्याने 40 हजार जणांना प्रवास करता यावा अशी आमची योजना असल्याचं खरे म्हणाले.

दीडपटीने भाडे जास्त –
सध्या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या राजधानी किंवा शताब्दी एक्स्प्रेसपेक्षाही दीडपटीने भाडे जास्त ठेवण्यावर विचार केला जात आहे.

24 बुलेट ट्रेन-
बुलेट ट्रेन प्रकल्पात 24गाडय़ा येणार आहेत. यात सुरुवातीला एक किंवा दोन बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनविण्यात येणार आहेत. 10 आणि बारा डब्यांच्या या ट्रेन असल. दहा डब्यांच्या गाडीत 750 आसन व्यवस्था असेल. तर 16 डब्यांच्या गाडीत 1250 आसने असतील. 2023 सालापर्यंत 10 डब्यांची गाडी येईल आणि 16 डब्यांची गाडी 2033 पर्यंत येणार आहे. यामधे बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.

आणखी काय असतील सुविधा –
उत्तम दर्जाची आसन व्यवस्था
आधुनिक प्रसाधनगृहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे.
एखादा प्रवासी आजारी झाल्यास आरामासाठी स्वंतत्र छोटी खोली.
डब्यात सीसीटीव्ही, आपत्कालीन इंटरकॉम यंत्रणा
स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा
स्वयंचलित ब्रेक यंत्रणा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullet train between mumbai ahmedabad to run every 20 minutes in peak hours
First published on: 26-03-2018 at 12:40 IST