26 February 2021

News Flash

बैलगाडा शर्यतीसंदर्भातील विधेयकाला विधानसभेत मंजुरी

या शर्यतींवर २०११ मध्ये बंदी घालण्यात आली होती

बैलांचा होणारा छळ थांबविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी घातली होती.

महाराष्ट्र विधानसभेनी आज बैलगाडा शर्यतींच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. पशुपालन मंत्री महादेव जानकर यांनी हे विधेयक विधानसभेत ठेवले होते. पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यामध्ये सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आल्याने आता बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा होणार आहे. या विधेयकात सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. तामिळनाडूतील जलीकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होण्याची शक्यता होती. राज्य सरकारने बैलगाडा शर्यत सुरू कराव्या त्यासाठी लोकांनी हालचाली सुरू केल्या होत्या.

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून लोकांनी वेळोवेळी सरकारला विनंती केली होती. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी राज्यातील बैलगाडी संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीत संघटनांच्या प्रतिनिधींनी जलिकट्टूप्रमाणेच बैलगाडी शर्यतींना परवानगी देण्याची मागणी करत अध्यादेश काढण्याची विनंती केली होती. त्यावेळी आचारसंहिता संपल्यावर या संदर्भात पावले टाकले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

तामिळनाडूतील जलिकट्टूप्रमाणे महाराष्ट्रात बैलगाडीच्या शर्यतींना परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली होती. यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलांना अतिशय निर्दयीपणे वागवण्यात येत असल्याने २०११ मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली गेली होती. त्यामुळे बैलगाडा शर्यतींवरही बंदी आली. हा वाद पुढे न्यायालयात गेल्यावर निकाल बैलगाडा मालकांच्या विरोधात लागला. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला.

मध्यंतरीच्या काळात केंद्रात सत्ताबदल झाल्यावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घेतली होती. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घ्यावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रकाश जावडेकरांकडे केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 6:56 pm

Web Title: bullock cart race legalized maharashtra bailgada race assembly clears bill
Next Stories
1 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे फक्त १ रूपया
2 शिवस्मारकासाठी निधीची तरतूद कशी करणार ?: मुंबई हायकोर्ट
3 पहारेकऱ्यांचा सेनेला पहिला हिसका
Just Now!
X