वडाळा रोड येथे रेल्वे मार्गातून जाणाऱ्या प्रवाशाने टाकलेल्या कपडय़ाच्या गाठोडय़ामुळे हार्बर रेल्वेच्या मुंबईकडे येणाऱ्या गाडीचा एक डबा रुळावरून घसरण्याची आश्चर्यकारक घटना मंगळवारी दुपारी ४.३० वाजता घडली. यामुळे सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्यांमुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.
दुपारी ४.२३ वाजता वाशीहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणारी उपनगरी गाडी वडाळा रोड स्थानकाजवळ आली असता त्याच मार्गातून एकजण डोक्यावर मोठे कपडय़ाचे गाठोडे घेऊन जात होता. गाडीच्या मोटरमनने त्याचे लक्ष वेधण्यासाठी हॉर्न वाजवला. मात्र त्याने भेदरलेल्या त्या व्यक्तीने डोक्यावरील गाठोडे खाली टाकून पळ काढला. त्या गाठोडय़ाला धडकून गाडीच्या पहिल्या डब्याची दोन चाके रुळावरून घसरली. ही गाडी स्थानकाजवळ असल्याने विशेष वेगात नव्हती.
या घटनेनंतर पनवेल-सीएसटी मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. गाडीचा डबा रुळावर आणण्यासाठी मार्गातील विद्युतप्रवाह बंद करण्यात आला होता. त्यामुळे पनवेलकडे जाणाऱ्या दोन गाडय़ा मेन लाइनने कुल्र्यापर्यंत आणण्यात आल्या. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्यामुळे हार्बर मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सीएसटी-अंधेरी मार्गावरील वाहतूकही काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४.५० नंतर सीएसटीकडे येणाऱ्या गाडय़ा वडाळा रोड येथे फलाट क्रमांक तीनवर वळविण्यात आल्या होत्या. तर हार्बर मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे विलंबाने सुरू होती. या घटनेनंतर रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्यांमुळे उपनगरी रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.