शाळेतील उपस्थिती आणि ऑनलाइन वर्ग सांभाळताना शिक्षकांची त्रेधा होत असतानाच आता त्यात निवडणुकीच्या कामाची भर पडली आहे. दहावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेतील शिक्षकांनाही निवडणुकीचे काम देण्यात आले आहे.

सध्या मुंबई, ठाण्यातील शाळा विद्यार्थ्यांसाठी डिसेंबरअखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी शिक्षकांना शाळेत हजेरी लावावी लागत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग, परीक्षा, चाचण्या हेदेखील सांभाळावे लागत आहे. अनेक शिक्षक करोना रुग्णांचे सर्वेक्षण, नोंदी अशा कामातून नुकतेच मोकळे झाले आहेत. या सर्व गोंधळात आता निवडणूक कामाची भर पडली आहे. मुंबई, नवी मुंबईतील शिक्षकांची मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेतील परीक्षेचे काम आणि निवडणूक यादी दुरुस्ती, त्याचे प्रशिक्षण, बैठका हे सर्व कसे सांभाळायचे असा प्रश्न शिक्षकांना सतावत आहे.

शिक्षकांना सातत्याने अशैक्षणिक कामे दिली जातात. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही घरोघरी फिरून मतदार यादी दुरुस्त करण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले आहे. शिक्षण विभागाची परवानगी घेऊनच शिक्षकांना कामे देण्यात यावीत.

– शिवनाथ दराडे, शिक्षक परिषदेचे मुंबईचे कार्यवाह