News Flash

बांधकाम उद्योगावर दरवाढीचा बोजा

घरांच्या किमती कमी करण्याची इच्छा असली तरी तसे करता येणार नाही

संग्रहित छायाचित्र

निशांत सरवणकर

सिमेंट, लोखंड महागले; घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता धूसर

करोना संसर्गाच्या पाश्वर्भूमीवर बांधकाम उद्योग काही प्रमाणात सुरू व्हावा, अशी केंद्र सरकारची इच्छा असली तरी सिमेंट व बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडाची अचानक भाववाढ झाल्याने आता विकासकांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

या भाववाढीमुळे अचानक मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार असून त्याचा फटका अर्थातच बांधकाम उद्योगाला बसणार असल्याचा दावा विकासकांनी केला आहे. त्यामुळे घरांच्या किमती कमी करण्याची इच्छा असली तरी तसे करता येणार नाही, याकडे या विकासकांनी लक्ष वेधले.

देशभरात दुसरी टाळेबंदी लागू झाली तेव्हाच केंद्र सरकारने बांधकाम उद्योग सुरू व्हावा, अशा आशयाचे आदेश जारी केले होते. बांधकामाच्या ज्या ठिकाणी मजूर आहेत त्यांना काम करण्यास परवानगी देण्यास हिरवा कंदील दाखविला होता. मात्र याबाबतचा निर्णय त्यांनी राज्य सरकारांवर सोपविला होता. लाल क्षेत्रात परवानगी द्यायची किंवा नाही, याचा निर्णय राज्यांनी त्या त्या परिसरातील पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविला होता. त्यांनी बांधकाम सुरू करण्यासाठी अटी घातल्या होत्या. सिमेंट आणि लोखंडात झालेल्या दरवाढीची बाब ‘कॉन्फर्डेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (क्रेडाई) केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी संरक्षण मंत्री हरदीपसिंग पुरी यांना लेखी पत्राद्वारे कळविली आहे. या  किमतींवर केंद्र सरकारने नियंत्रण आणण्याची मागणी या संघटनेने केली आहे. बांधकाम उद्योग केंद्र सरकारकडून भरघोस आर्थिक संरक्षण मिळाल्याशिवाय पुन्हा उभा राहणे कठीण आहे. अशावेळी सिमेंट, लोखंड उत्पादकांकडून अचानक भाववाढ करणे म्हणजे विकासकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. हे नीतिमत्तेला धरून नसल्याचे मत ‘क्रेडाई’चे कार्याध्यक्ष जक्षय शाह यांनी व्यक्त केले.

दरवाढीचे स्वरूप.

देशभरात सिमेंटच्या प्रत्येक गोणीमागे शंभर ते दीडशे रुपये वाढ. बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडाच्या किमतीत प्रति मेट्रीक टनमागे दोन ते अडीच हजार रुपये वाढ.

झाले काय?

सर्व अटींची पूर्तता करून काम सुरू करण्यास इच्छुक असलेल्या विकासकांना सिमेंट आणि लोखंडाच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती मिळाली आणि ते अस्वस्थ झाले. या वाढीमुळे काम सुरू केल्यानंतर जे रेडिमेड मिक्सर लागते त्याचा प्रत्येक ट्रकमागेही दरही आपसूकच वाढणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आधीच आर्थिक चणचणीत असताना ही वाढ आर्थिक गणित बिघडवून टाकणारी असल्याची प्रतिक्रिया विकासकांमधून उमटली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:37 am

Web Title: burden of inflation on the construction industry abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 विद्यापीठाची परीक्षांबाबत मदतवाहिनी
2 वंजारी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या उमेदवारीत बदल
3 काँग्रेसकडून उमेदवारीचा प्रस्ताव होता : खडसे
Just Now!
X