26 January 2021

News Flash

विद्यार्थ्यांच्या वजनाच्या प्रमाणात दप्तराचे ओझे

केवळ दहा टक्केच वजन असावे, केंद्राचे धोरण जाहीर

संग्रहित छायाचित्र

अर्ध्याहून अधिक शैक्षणिक वर्ष ऑनलाइन वर्गामुळे विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका झाली आहे. आता पुढील शैक्षणिक वर्षांतही विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी करण्यासाठी केंद्राने धोरण आखले आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्क्य़ांपेक्षा अधिक दप्तराचे वजन असू नये असे मसुद्यात नमूद केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गृहपाठाचा भारही या धोरणाने मी केला आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या वजनाचा विषय सातत्याने चर्चेत असतो. वह्य़ा, पुस्तके, डबा, पाण्याची बाटली, प्रकल्प, अभ्यासपूरक साहित्य, खेळासाठी स्वतंत्र गणवेश अशा अनेक गोष्टींनी भरलेले दप्तर विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादले गेले आहे. दप्तराचे वजन कमी करण्याबाबत न्यायालयातही याचिका दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने धोरण तयार करण्यासाठी २०१८ मध्ये तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने दिलेला अहवाल केंद्रीय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. या धोरणाप्रमाणे अंमलजबावणी करण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत.

चाके असलेली दप्तरे नको

अनेकदा विद्यार्थ्यांच्या दप्तराचे मूळ वजनच अधिक असते. त्यात साहित्य भरल्यावर ते अधिकच वाढत जाते. त्यामुळे कमी वजनाचे कापड किंवा साहित्य वापरून तयार केलेली दप्तरेच विद्यार्थ्यांना द्यावीत. दोन्ही खांद्यावर लावता येतील अशी आणि मऊ पट्टे असेलली दप्तरे असावीत. त्याचप्रमाणे पाठीवर दप्तराचे वजन नको म्हणून चाके असलेली दप्तरे वापरण्याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. मात्र ही चाके असलेल्या दप्तरांचे वजन अधिक असते. त्यामुळे अशी दप्तरे वापरण्यात येऊ नयेत, अशी सूचना देण्यता आली आहे.

गृहपाठही घटणार

दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरदिवशी दोन तास आणि त्यापुढील विद्यार्थ्यांना दरदिवशी दोन ते पाच तासांपर्यंत गृहपाठ शाळा देतात असे विद्यार्थी आणि पालकांच्या सर्वेक्षणातून समोर आले. त्या अनुषंगाने कोणत्या इयत्तेसाठी किती गृहपाठ द्यावा याचेही कोष्टक केंद्राच्या धोरणात देण्यात आले आहे. त्यानुसार पूर्वप्राथमिक ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडय़ाला २ तासांपर्यंत, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ ते ६ तास आठवडय़ाला आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आठवडय़ाला १० ते १२ तासांचा  गृहपाठ असावा.

धोरण मसुदा काय?

पूर्वप्राथमिक वर्गाची शाळा शक्यतो दप्तराविना असावी.

पहिली आणि दुसरीसाठी एक वही तर तिसरी ते पाचवीसाठी एक वर्गातील अभ्यासाची आणि एक गृहपाठाची अशा दोन वह्य़ा असाव्यात.

सहावीपासून पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टे कागद आणण्याची परवानगी द्यावी.

कागद संकलित करून ते टाचून (फायलिंग) कसे ठेवावे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे. शाळांनी माध्यान्ह भोजन आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

अधिक वह्य़ा, पुस्तके आणावी लागणार नाहीत असे वेळापत्रक असावे.

पाठय़पुस्तके एकत्रित वापरण्याची किंवा एकमेकांत देवाणघेवाण करण्याची मुभा विद्यार्थ्यांना द्यावी. त्याचबरोबर प्रत्येक पाठय़पुस्तकावर त्याचे वजनही छापण्यात यावे. ते वजन लक्षात घेऊन शाळांनी वेळापत्रक निश्चित करावे.

शिक्षकांनी वारंवार विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावे.

कोणत्या इयत्तेसाठी किती वजनाचे दप्तर

इयत्ता विद्यार्थ्यांचे वजन   दप्तराचे वजन

पूर्वप्राथमिक १० ते १६   दप्तर नको

पहिली , दुसरी १६ ते २२   १.६  ते २.२

तिसरी ते पाचवी     १७ ते २५   १.७  ते २.५

सहावी, सातवी  २० ते ३०   २ ते ३

आठवी     २५ ते ४०   २ ते ५.४

नववी, दहावी    २५ ते ४५   २.५ ते ४.५

अकरावी, बारावी ३५ ते ५०   ३ ते ५.५

विद्यार्थ्यांचे आणि दप्तराचे वजन किलोग्रॅममध्ये आहे.

राज्याने यापूर्वीच धोरण अंमलात आणले आहे. त्यातील अनेक बाबी केंद्राने स्वीकारल्या आहेत. पालक आणि शिक्षकांनी जागरूकपणे अंमलबजावणी केली पाहिजे.

– दिनकर टेमकर, केंद्रीय समितीचे सदस्य आणि सहसंचालक, प्राथमिक शिक्षण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 12:19 am

Web Title: burden of the backpack in proportion to the weight of the students abn 97
Next Stories
1 स्त्रियांना समान संधी हवी -पुनित रंजन
2 चाचण्या वाढूनही बाधितांची संख्या कमी
3 कंगनाच्या बंगल्यावरील कारवाई बेकायदा
Just Now!
X