वांद्रे येथील एका चाळीत हत्या झालेल्या भरत पंजीयारा (५५) यांच्या हत्येचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखा ८ च्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिवदत्त उर्फ बिलटू उर्फ शिवम सुबोधचंद्र साह याला गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली.
 भरत पंजीयारा हे वांद्रे (पूर्व) येथील संत ज्ञानेश्वर नगराती दुर्गामाता चाळीत एकटेच राहात होते. १५ जुलै रोजी त्यांची अज्ञात इसमाने गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहही जाळून टाकण्यात आल्याने पोलिसापुंढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. पंजीयारा हे बर्गर, व्हेज रोल बनवून विक्री करत असत.
गुन्हे शाखा ८ च्या पथकाला या प्रकरणाचा तपास करताना मयत पंजीयाला यांना काही दिवसांपूर्वी ५१ हजार रुपेय भिशीतून मिळाले होते, अशी माहिती मिळाली. तोच धागा पकडून पोलिसांनी या परिसरातील लॉटरीचा नाद असलेल्या शिवद्दत साह याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पंजीयारा यांचे भिशीचे पैसे हडप करण्यासाठी हत्या केल्याची कबुली दिली.
१५ जुलैला तो पंजीयारा यांच्या घरात झोपण्यासाठी गेला आणि तेथेच चाकूने त्यांची हत्या केली. आरोपी साह हा मूळ झारखंडचा असून शनिवारी तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केल्याची माहिती गुन्हे शाखा ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फटांगरे यांनी दिली.