मुंबई म्हटलं तर सर्वात पहिली समोर दिसते ती म्हणजे धावपळ. या धावपळीच्या आयुष्यात लोकांना एकमेकांसाठी वेळच नसतो. अनेकदा या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण माणुसकी हरवल्याची तक्रार करत असतो. पण काही वेळा अशा काही घटना समोर येतात ज्यामुळे माणुसकी अद्यापही जिवंत आहे यावर विश्वास बसतो. अशीच एक घटना समोर आली आहे जिथे निर्मनुष्य बस स्टॉपवर तरुणीसाठी बस ड्रायव्हर आणि चालकाने बस १० मिनिटे थांबवून ठेवली. जोपर्यंत त्या तरुणीला रिक्षा मिळत नाही तोपर्यंत बस तिथेच थांबून होती. तरुणीने हा प्रसंग शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ड्रायव्हर आणि कंडक्टरचं कौतूक केलं जात आहे.

आरे कॉलनी येथील निर्मनुष्य रस्त्यावर मंताशा शेख उतरली होती. रात्रीचे १.३० वाजले असल्याने चालक प्रशांत मयेकर आणि कंडक्टर राज दिनकर यांनी तिला घरातून कोणी नेण्यासाठी येणार आहे का ? अशी विचारणा केली. मंताशा शेखने नाही असं सांगताच दोघांनीही जोपर्यंत तिला रिक्षा मिळत नाही तोपर्यंत बस थांबवून ठेवली. इतकंच नाही तर रिक्षा योग्य दिशेने जात असल्याची खात्री होत नाही तोपर्यत ते थांबून होते.

दोघांच्या कृतीने भारावलेल्या मंताशा शेखने ट्विटरवर हा प्रसंग शेअर केला आहे. या निस्वार्थ कृतीमुळे मी पुन्हा एकदा या शहराच्या प्रेमात पडले आहेत. ‘यामुळेच माझं मुंबईवर प्रचंड प्रेम आहे. ३९४ लिमिटेड बसच्या चालकाचे आभार’, असं मंताशाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून जवळपास दोन हजार जणांनी रिट्विट केलं असून पाच हजार जणांनी लाइक केलं आहे. एकीकडे देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत असताना, त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना ही घटना थोडा दिलासा देणारी आहे.

मंताशा आरेमधील रॉयल पाल्म्स येथील रहिवासी आहे. मगंळवारी संध्याकाळी ती आपल्या नातेवाईकाच्या घरी गेली होती. मात्र तेथून निघताना वेळेचं भान राहिलं नाही. साकीनाका येथून तिने बस पकडली आणि रात्री १.३० वाजता आरे कॉलनीत पोहोचली.

नवरा शहराबाहेर असल्याने आपल्याला एकटं घरी जावं लागणार आहे याची मंताशाला कल्पना होती. आरे कॉलनीतील त्या निर्मनुष्य रस्त्यावर आपल्याला एकटं उभं राहून रिक्षाची वाट पहावी लागणार असल्याचीही तिला जाणीव होती. मात्र त्याचवेळी चालक मयेकर आणि कंडक्टर दिनकर यांनी तिच्याकडे कोणी नेण्यासाठी येत आहे का ? अशी विचारणा केली. ज्यावर नाही असं उत्तर मिळताच त्यांनी चक्क रिक्षा मिळेपर्यंत बस थांबवली. इतकंच नाही तर जोपर्यंत रिक्षा योग्य दिशेने जात असल्याची खात्री झाली नाही तोपर्यंत ते थांबले होते.

३४ वर्षीय कंडक्टर दिनकर गेल्या १० वर्षांपासून बेस्टमध्ये काम करत आहेत. आपल्याला प्रशिक्षणादरम्यान जे शिकवण्यात आलं होतं, तेच आपण केलं असं त्यांनी सांगितलं आहे. ‘प्रशिक्षणादरम्यान आम्हाला कशाप्रकारे महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक तसंच लहान मुलांना प्रवासात सुरक्षित वाटलं पाहिजे हे शिकवण्यात आलं होतं. महिला प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आरे कॉलनीसारख्या निर्मनुष्य ठिकाणी एखादी महिला उतरल्यानंतर आम्ही जास्त काळजी घेतो’, असं दिनकर यांनी सांगितलं आहे.