News Flash

नाताळ सुट्टीत बसभाडय़ात वाढ

रेल्वेची प्रतीक्षा यादीही लांबलचक

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

खासगी बसचे तिकीट दर दुपटीवर; रेल्वेची प्रतीक्षा यादीही लांबलचक

वर्षअखेर आणि शनिवार-रविवारला जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे फिरायला कुठे जायचे, याचे बेत आखले जात आहेत. नाताळाची सुट्टी २५ डिसेंबरपासून सुरू होत असली तरी त्याआधी चौथा शनिवार आणि रविवार अशा जोडून आलेल्या सुट्टय़ांचा लाभ घेत अनेकांनी रेल्वे, खासगी बस गाडय़ांचे आरक्षण केल्याने प्रतीक्षा यादी वाढली आहे. हीच संधी साधून खासगी वाहतूकदारांनी प्रवासभाडे दुप्पट केल्याने प्रवाशांना खिसा हलका करावा लागणार आहे.

नाताळ सुट्टी आणि त्यातच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोवा, कोकण, महाबळेश्वर यासह अलिबाग, नागपूर, औरंगाबादमधील काही पर्यटनस्थळी जाण्याचाच बेत आखला जातो. गर्दीचा काळ सुरू होत असल्याने २३ डिसेंबरपासून ते ३१ डिसेंबपर्यंत बसच्या तिकीट दरांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एरवी मुंबई ते गोवापर्यंत वातानुकूलित स्लीपर बसने प्रवास करण्यासाठी ८०० रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागत असतानाच २३ डिसेंबरपासून हेच दर दोन हजार २०० रुपये असतील. तर महाबळेश्वरसाठी वातानुकूलित स्लीपर बससेवेसाठी ५०० ते ६०० रुपये आकारण्यात येणारे दर एक हजार रुपये आणि वातानुकूलित आसन बस प्रकाराचे तिकीट दर ४०० रुपयांवरून थेट ८०० रुपयांपर्यंत आकारण्यात येणार आहे. मालवणला जाण्यासाठीही पर्यटकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मालवणसाठी बिगर वातानुकूलित बसच्या सध्याच्या असलेल्या ६०० ते ७०० रुपये तिकीट दरांतही मोठी वाढ करण्यात येणार आहे.

२३ डिसेंबरपासून कोकणात जाण्याऱ्या एक्स्प्रेस गाडय़ांच्या तिकिटासाठीही झुंबड होती. जनशताब्दी, मांडवी, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेससह तेजस एक्स्प्रेसचे तिकीट काढताना प्रवाशांना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागत आहे. २३ डिसेंबर आणि २४ डिसेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसला सेकंड सिटिंगसाठी जवळपास ४००ची प्रतीक्षा यादी येत होती. या श्रेणीचे तिकीटच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर ३० डिसेंबर रोजी याच श्रेणीतील प्रतीक्षा यादी १५० च्या पुढे गेली आहे. हीच स्थिती दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसचीही आहे.

संपूर्ण वातानुकूलित अशा तेजस एक्स्प्रेसच्या चेअर कार श्रेणीलादेखील २३ डिसेंबर रोजी १०० च्या वर आणि एक्झिक्युटिव्ह क्लास श्रेणीलाही बऱ्यापैकी प्रतीक्षा यादी आहे. ३० डिसेंबर रोजीही २५ पेक्षा जास्त प्रतीक्षा यादी या एक्स्प्रेसला आहे. तर कोकण आणि त्या मार्गे जाणाऱ्या अन्य एक्स्प्रेस गाडय़ांनाही प्रतीक्षा यादी मोठी आहे.

जनशताब्दीच्या विस्टाडोमसाठीही प्रतीक्षा यादी

दादर ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी विस्टाडोम हा सर्व सुविधांनी युक्त असा काचेचा पारदर्शक डबा जोडण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात डबा जोडल्यानंतर त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विस्टाडोमच्या एक्झिक्युटिव्ह डब्यालाही २३ डिसेंबरपासून ते ३० डिसेंबपर्यंत प्रतीक्षा यादी आहे.  विस्टाडोमसाठी २३ डिसेंबर रोजी ५०, तर अन्य दिवशी १५च्या पुढे प्रवाशांना प्रतीक्षा यादी येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 2:15 am

Web Title: bus fare hike in christmas vacations
Next Stories
1 मध्य रेल्वेचे वेळापत्रक घसरलेलेच
2 वाहनतळ धोरणाच्या प्रयोगाला सुरुवात
3 विद्यार्थ्यांना पुरवणी द्या!
Just Now!
X