प्रस्तावावर आज निर्णय; प्रवासीसंख्या घटण्याची भीती
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तोटय़ामुळे ‘बेस्ट’चा आर्थिक डोलारा डळमळला असून बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी प्रशासनाने मासिक पासमध्ये आणि सवलतीच्या दरातील तिकीटाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामु़ळे विद्यार्थ्यांचा पास तब्बल दुपटीने महागणार आहे. दरवाढीबाबत तयार करण्यात आलेला प्रस्ताव आज, गुरुवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. पास आणि तिकीटांच्या दरवाढीमुळे बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घसरण्याची शक्यता आहे.
आर्थिक विवंचनेतून बेस्टला सावरण्यासाठी प्रशासनाने उत्पन्नाच्या स्रोतांचा विचार सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मासिक पासच्या दरात वाढ सूचविण्यात आली आहे. गेल्या महिन्यात तिजोरीत खडखडाट असल्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतन मिळाले होते. एप्रिल महिन्यातही बेस्टच्या कर्मचाऱ्यांना विलंबानेच वेतन मिळण्याची चिन्हे आहेत. बेस्टने आपल्या पायावर उभे राहण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याची सूचना पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केली होती. त्यानुसार बेस्टने कृती आराखडा तयार केला आहे. मात्र त्याबाबत एकमत होऊ शकलेले नाही. बेस्टने दरवाढ सुचवून थेट प्रवाशांच्या खिशात हात घालण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे प्रवासी संघ्या घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेस्ट समितीच्या गुरुवारच्या बैठकीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आणि भाजपकडूनही विरोध होण्याची शक्यता आहे.
भाडेवाढ किती?
सध्या पहिल्या दोन कि.मी. अंतराच्या मासिक पाससाठी ३६० रुपये मोजावे लागतात. आता त्यासाठी ५७५ रुपये द्यावे लागणार आहे. तिमाही पास १०६० रुपयांवरुन साधारण १७२५ रुपयांवर जाणार आहे. वातानुकूलित बसचा मासिक पास ६६० रुपयांवरुन १२०० रुपये होणार आहे.
‘समृद्धी’ मार्गाविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीची यात्रा
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नागपूर ते शहापूर या समृद्धी मार्गासाठी भूसंपादनास होणारा विरोध लक्षात घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या मार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘समृद्धी मार्ग विकास नव्हे विनाश’ अशी भूमिका घेत मे महिन्याच्या सुरुवातीला ही यात्रा काढण्यात येणार आहे. नागपूरहून सुरुवात होऊन प्रस्तावित मार्गातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे. या मार्गाला जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. यावरून ठिकठिकाणी आंदोलने झाली आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याचा या यात्रेचा हेतू असल्याचे संघर्ष यात्रेचे समन्वयक जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. शहापूरला या यात्रेची सांगता होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 1:39 am