सोमवारपासून बेस्टच्या बसमधून आणि रेल्वेतून लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिकांना जादा पदरमोड करावी लागणार आहे. बेस्ट बसच्या पहिल्या दोन टप्प्याच्या प्रवासासाठी मुंबईकरांना एक रुपया जादा मोजावा लागणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्यानुसार लांबपल्ल्याचे आरक्षण, तात्काळ तिकीट, आरक्षण रद्द करणे आदींच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीवरील तिकीट रद्द करण्यासाठी असलेले शुल्कही वाढविण्यात आले आहे. तसेच सुपरफास्ट गाडय़ांतील विविध श्रेणींच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. मात्र त्याच वेळी उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी सहामाही आणि वार्षिक पास योजना सुरू करण्यात आली आहे.