हॉटेल, दुग्धालय, बेकरी, केशकर्तनालय, पानाची गादी उघडणे सोपे

मुंबईमध्ये हॉटेलसह विविध ३८ व्यवसायांसाठी दिल्या जाणाऱ्या परवान्यांतील जाचक अटी काढून टाकण्यात आल्या असून, सुमारे २० अटी कमी करण्यात आल्या आहेत. मात्र अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे मुंबईत व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळू शकेल, असा आशावाद पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये नवीन उपाहारगृह, लॉजिंग हाऊस, परमिट रूम, बिअर बार, मिठाई, खाद्यपदार्थ, शीतपेये, औषधे आदी दुकाने, पिठाची गिरणी, फ्रूट ज्युस सेंटर, फळ व खाद्यापदार्थाची शीतगृहे, लॉड्री, दुग्धालय, केशकर्तनालय, पानाची गादी, बेकरी, घोडय़ांचे तबेले, उसाच्या रसाची दुकाने, पापड निर्मिती, सोडावॉटर निर्मिती, चहा विक्री, खाद्यतेल निर्मिती आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेकडून परवाना दिला जातो. या व्यवसायांसाठी परवाना देण्यापूर्वी संबंधितांना पालिकेच्या ७२ अटींची पूर्तता करावी लागत होती. त्यासाठी विविध विभागांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळवावे लागत होते. मात्र आता या अटींची संख्या ५२ वर आणण्यात आली आहे. पूर्वी या व्यवसायांसाठी पालिकेच्या इमारत व कारखाने खाते व अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले होते. मात्र आता केवळ अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याशी संबंधित विविध अर्ज नमुने व संबंधित परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी ‘आहार’, ‘एचआरएडब्ल्यू’ आणि ‘नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशनकडून करण्यात आली होती. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील अनुज्ञापन पत्र व मंजुरीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सांगितले.

अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र मात्र आवश्यक

मुंबईत कुर्ला येथे एका उपाहार गृहात लागलेल्या आगीत काही विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू ओढवला होता. त्यामुळे तब्बल ७२ पैकी २० अटी कमी केल्या असल्या तरी अग्निशमन दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मात्र हॉटेलांना सक्तीचेच आहे.