घटनास्थळावरून चिठ्ठी हस्तगत, आत्महत्येचा अंदाज

मुंबई : कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरातील कारखान्यात बुधवारी संध्याकाळी एका व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केली. याच कारखान्यात त्यांच्या दोन मुलीही मृतावस्थेत आढळल्या. व्यावसायिकानेच मुलींच्या हत्येनंतर स्वत: आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहेत.

मालवणी परिसरात पत्नी आणि चार मुलींसह राहाणाऱ्या असगर अली जब्बार अली (वय ४५) यांचा कांदिवलीच्या लालजी पाडा, गणेश नगर परिसरात कारखाना आहे. ते लोखंडी, लाकडी वस्तूंवर कलाकुसर करतात. आपल्या दोन मुलींना (वय १२ आणि ८ र्वष) कारखाना दाखवून आणतो, असे सांगून अली घरातून बाहेर पडले. दुपारी चापर्यंत ते पत्नीच्या संपर्कात होते. मात्र त्यानंतर अली यांचा मोबाइल बंद येऊ लागल्याने त्यांच्या पत्नीने कारखान्याशेजारील परिचित व्यक्तींशी संपर्क साधला. ते परिचित कारखान्याजवळ गेले असता कारखान्याचे दार आतून बंद असल्याचे त्यांना आढळले. आतून काहीच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी खिडकीच्या फटीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला असता अली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांनी अली यांच्या कु टुंबासह आसपासच्या लोकांना या घटनेची माहिती दिली.

कांदिवली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अली गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. तर १२ वर्षांची मुलगी जमिनीवर आणि दुसरी मुलगी खुर्चीवर बेशुद्धावस्थेत आढळली. तिघांना शासकीय रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिघांना मृत घोषीत के ले. दोन्ही मुलींच्या मृत्यूचे कारण शवचिकित्सेनंतर समजू शके ल, असे पोलीस उपायुक्त विशाल ठाकू र यांनी सांगितले.

ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून एक चिठ्ठी मिळाली असून त्यातील मजकुरावरून अली यांनी हे टोकाचे पाऊल आर्थिक चणचणीतून उचलले, असे समजते. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास करण्यात येत आहे.