घोडबंदर येथील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळच असलेल्या टोलेजंग पडीक इमारतीमध्ये रविवारी रात्री दहा ते बारा संशयित व्यक्ती मोठमोठय़ा बॅगा घेऊन शिरल्याच्या वृत्ताने ठाण्यात खळबळ उडाली. इमारतीच्या रखवालदारांनी दिलेल्या माहितीनंतर ठाणे पोलिसांनी मोठय़ा फौजफाटय़ासह हा संपूर्ण परिसर पिंजून काढला. खबरदारी म्हणून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी व तपासणीही करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. इमारतीत शिरलेल्या व्यक्ती कुठून आल्या व कुठे गायब झाल्या, याचे गूढही कायम आहे.
घोडबंदर येथील तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ सात टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मात्र, या इमारतीमध्ये कोणीही वास्तव्यास नसल्याने त्या गेल्या कित्येक वर्षांपासून पडीक आहेत. या इमारतींच्या सुरक्षिततेसाठी परिसरात सुरक्षारक्षक तैनात असतात. रविवारी रात्री या इमारतीमध्ये काही संशयित व्यक्ती शिरल्याची माहिती एका सुरक्षारक्षकाने ठाणे पोलिसांना दिली. त्यानंतर लगेचच ठाणे पोलिसांचे पथक, गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, शीघ्रकृती दल, राज्य राखीव दल आदी सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे ४ ते सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल सात तास पोलिसांची शोधमोहीम सुरू होती. ठाणे पोलिसांच्या पथकासह सर्वच यंत्रणांनी सात इमारती आणि त्यांचा परिसर पिंजून काढला. मात्र, त्या ठिकाणी कुणीही सापडले नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. या प्रकारामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून लॉज तसेच हॉटेलमध्ये तपासणी करण्यात येत आहे, असे ठाण्याचे सहपोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी सांगितले. तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ते कोण होते?
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुमो आणि झेन अशा दोन गाडय़ा आल्या आणि त्यामधून दहा जण उतरले. त्यांच्या पाठीवर मोठमोठय़ा बॅगा होत्या. त्यामुळे अतिरेकी असल्याचा संशय इमारतीच्या परिसरात असलेल्या एका सुरक्षारक्षकाला आला आणि त्याने ही माहिती कापुरबावडी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांची धावपळ सुरू झाली. मात्र, त्या व्यक्ती कोण होत्या हे अद्याप समजू शकलेले नाही.