दहा वर्षांपूर्वी शासनाने राज्यात डान्स बारवर बंदी आणली खरी. परंतु मुंबई, ठाणे, नवी मुंबईत छमछम बंद झालीच नाही. किंबहुना पोलिसांनी अनेक धाडी टाकल्या. अनेकांना अटका झाल्या. तरीही ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारचा हैदोस चोरीछुपे सुरूच होता. पोलिसांच्या हफ्त्यात मात्र त्यामुळे कमालीची वाढ झाली. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतरही शासनाची मानसिकता नसल्यामुळे डान्सबार सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पोलिसांचा आशीर्वाद असल्यामुळे छुपेपणे छमछम सुरूच राहणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गेल्या काही वर्षांत अडीचशेहून अधिक धाडी टाकल्या आहेत. प्रत्यक्षा डान्स बार सुरू असताना कारवाई केली गेली आहे. या डान्सबारचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. परंतु कालांतराने पुन्हा ते पुनरुज्जीवीत झाले आहेत. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरूच असल्याचे दिसून येते. डान्सबारच्या नावाखाली काही ठिकाणी पिकअप जॉइंटसही जोमाने सुरू आहेत. मध्यंतरी नवी मुंबई तसेच रायगडमध्येही अशा छुपेपणे सुरू असलेल्या डान्सबारवर कारवाई करण्यात आली. जितकी कारवाई होते तितके पोलिसांचे हप्ते वाढतात. वास्तविक पोलिसांसाठी हा हमखास आर्थिक स्रोत असल्यामुळे बंदी असली तरी छुपेपणे छमछम सुरू ठेवली जात होती. एका अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेही ते मान्य केले. समाजसेवा शाखेचे काम त्यामुळेच वाढल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.