चिमुकल्या भारतीय खेळाडूंची २२ पदकांची लयलूट

कर्क रोगावर मात केलेल्या मुलांसाठी रशियामधील मॉस्को येथे ऑगस्ट महिन्यात आयोजित केलेल्या पाचव्या ‘वर्ल्ड चिल्ड्रेन विनर्स गेम्स’ या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारतातील नऊ मुलांनी चमकदार कामगिरी करत २२ पदके पटकावली. असाध्य अशा कर्करोगाशी सामना करत असताना या मुलांनी ही कामगिरी केली हे विशेष.

कर्करोगावर मात करून पुन्हा सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या मुलांसाठी रशियाने ‘वर्ल्ड चिल्ड्रेन विनर्स गेम्स’ या स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा रशियाच्या राजधानी मॉस्को येथे ही स्पर्धा  ८ ते १७ वयोगटांतील मुलांमध्ये पार पडली. टाटा मेमोरियल सेंटरच्या ‘इम्पॅक्ट फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेने नऊ मुला-मुलींना क्रीडा स्पर्धेसाठी या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात मॉस्कोला पाठवले होते. १६ देशांतील मुलांशी टक्कर देताना भारतीय मुलांनी बुद्धिबळ, टेबलटेनिस, जलतरण, रायफल शूटिंग, धावणे आणि फुटबॉल या सहा क्रीडा प्रकारांमध्ये एकूण २२ पदके जिंकली. ज्यात सहा सुवर्ण, सात रजत आणि नऊ  कांस्यपदकांचा समावेश आहे. त्यातील चार पदके ही रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारातील आहेत.

पाल्र्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजचे प्रशिक्षक जितेश कदम आणि स्नेहल पापळकर-कदम या जोडप्याने या विद्यार्थ्यांना दोन महिने रायफल शूटिंगसाठीचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले. याविषयी माहिती देताना रेंज इन्चार्ज जितेश कदम यांनी सांगितले की, रोजची शाळा सांभाळून ही मुले रायफल शूटिंगचा सराव करत असत. संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी या मुला-मुलींना रायफल शूटिंग रेंजच्या सुविधा, अगदी परदेशी बनावटीच्या रायफल्ससुद्धा अत्यल्प शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेतला.

नऊ  खेळाडूंमध्ये भार्गव जैन, काव्या सगळगिळे, गर्विल प्रतीक, कुणाल महामुनी, इब्ने अली, रितिक अंदे, दराब मोहम्मद अन्सारी हे सात जण मुंबई-ठाणे परिसरातील आहेत, तर झोहेर धिनोजवाला हा तेलंगणाचा, तर मिहिर सिंग हा मध्य प्रदेशचा आहे. नियमित वैद्यकीय पाठपुराव्यामुळे लहान मुलांमधील कर्करोग पूर्णपणे बरा होतो. या मुलांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेलं यश हे समाजातील प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. असं मत टाटा मेमोरियलच्या अमिता भाटिया यांनी व्यक्त केले.