मुंबई : उत्तर प्रदेशातील तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील भाजपच्या दारुण पराभवाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अपयशाचा ठपका बसला असतानाचा विदर्भ या बालेकिल्ल्यातील भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पराभवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अपयशाचा शिक्का बसला आहे. मात्र, पालघर मतदारसंघातील विजयाने फडणवीस यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या फुलपूर मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला होता. या पाश्र्वभूमीवर कैरानामध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय संपादन करायचा, असा निर्धार भाजप आणि मुख्यमंत्री योगी यांनी केला होता. मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपकडून प्रयत्न झाला. पण समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस आणि अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोकदल हे पक्ष एकत्र आल्याने कैरानामध्येही भाजपचा पराभव झाला.

राज्यात पालघर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विदर्भातील भंडारा-गोंदियामध्ये सहज विजय मिळेल, असे भाजपचे गणित होते. पालघरमध्ये विजय मिळाला असला तरी शिवसेनेने तेथे कडवी लढत दिली. भंडारा-गोंदियात पराभव पत्करावा लागला. परिणामी उत्तर प्रदेशप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अपयशाचा शिक्का बसला.

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर लगेचच झालेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली होती. आताही लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रावर भाजपची मदार आहे. विदर्भात एकतर्फी यश मिळावे, असा भाजपचा प्रयत्न आहे. पण भंडारा-गोंदियातील पराभवाने विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलेला नाही, असा संदेश गेला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास विदर्भात भाजपला सोपे राहणार नाही. विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये सत्ताधारी पक्षाबाबत नाराजी आहे. त्याचाच फटका भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपला बसला.