मोदींच्या नावावर आणि आशीर्वादानेच शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. नाहीतर यांच्या स्वतःच्या नावावर आणि कर्तुत्वावर २५ आमदारही निवडून आले नसते, अशा शब्दांत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपा नेते नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर सडकून टीका केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या मुद्द्यांवरुन निशाणा साधला.

आणखी वाचा- सुशांतच्या खुनाच्या आरोपाखाली आदित्य ठाकरे गजाआड जाणार – नारायण राणे

राणे म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या धोरणांबद्दल बोलण्याची या मुख्यमंत्र्यांची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्र पहावा, महाराष्ट्र सांभाळावा, राज्यातील अडचणी आणि करोनाचे मृत्यू कमी कसे होतील याकडे लक्ष द्यावं. खरंतर उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही. कारण यांनी हिंदुत्वाच्या नावाने निवडणुकीच्या पूर्वी भाजपासोबत युती केली. मोदींच्या नावावर यांचे ५६ आमदार निवडून आले. मोदींच्या आशीर्वादानेच मुख्यमंत्री झाले. नाहीतर यांच्या स्वतःच्या नावावर आणि कर्तुत्वावर २५ आमदारही निवडून आले नसते.”

आणखी वाचा- “बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं”

उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली, हिंदुत्व सोडलं आणि सेक्युलर पार्टीसोबत गेले आणि काल सांगतात आम्ही आजही हिंदू आहोत, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हे तुम्हाला आज कळलं का? असा सवाल करीत बेईमानी करुन हिंदुत्वाला मुठमाती देऊन मुख्यमंत्रीपद मिळवलंत अशा शब्दांत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.