भायखळा तुरुंगातील महिला कैदी मंजुळा शेट्येच्या हत्येप्रकरणी दोषी आढळणाऱ्या तुरुंगातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर ही घटना टाळता आली असती, असंही त्यांनी सांगितलं.

भायखळा तुरुंगातील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवेळी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला असता तर कदाचित ही घटना टाळता आली असती, असं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याप्रकरणी तुरुंगातील काही बड्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या मारहाणीत महिला कैदी मंजुळा शेट्ये हिचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर महिला कैद्यांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. या घटनेनंतर रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यात शीना बोरा हत्या प्रकरणात भायखळा तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जी हिनेही मंजुळा शेट्येला तुरुंग अधिकाऱ्यांकडून अमानूष मारहाण करण्यात आल्याचे सांगितले. तिच्या हत्येची मी साक्षीदार असल्याचं तिनं न्यायालयातही सांगितलं आहे. आपल्यालाही तुरुंग अधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आल्याचा आरोप तिनं केला आहे. या प्रकरणी न्यायालयानं तुरुंग अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याची परवानगी इंद्राणीला दिली आहे. या प्रकरणी आधीच काही तुरुंग अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागानं या मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं आहे. मंजुळा शेट्येच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप यायचा आहे. काही जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. एकूण २०० जणांचे जबाब नोंदवले आहेत. प्राथमिक चौकशीनंतर दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले. चौकशीनंतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रॅंचकडून केला जात आहे.