प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामास लवकरच सुरुवात

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तार प्रकल्पाच्या बृहत् आराखडय़ास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने अलीकडेच अंतिम मंजुरी दिली असून प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

राणीबागेच्या आधुनिकीकरण प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्राणिसंग्रहालयाचा विस्तार करण्यात येत असून पालिकेने अलीकडेच संपादित केलेल्या सुमारे १२ एकर भूखंडावर विदेशी प्रजातीच्या प्राण्यांसाठी विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहे.

पालिकेने प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारासाठी आधुनिकीकरण प्रकल्पाचे बृहत् आराखडे नोव्हेंबर २०१८ मध्ये नवी दिल्ली येथील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला सादर केले होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीने विदेशी प्रजातीच्या प्राण्यांसाठी सुविधा विकसित करण्याबाबतच्या बृहत् आराखडय़ास १२ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली.

प्राधिकरणाकडून मिळालेल्या मान्यतेमुळे आता विदेशी प्रजातीच्या प्राण्यांसाठी जलदगतीने सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जग्वार, चित्ता, पांढरा सिंह, झेब्रा, मँड्रिल मंकी, शहामृग, चिंपांझी अशा प्राण्यांसाठी पिंजरे, आवासस्थाने विकसित करण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या मे महिन्यापासून कामाला सुरुवात होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

आधीचे दोन टप्पे

* राणीबागेच्या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एन्ट्री प्लाझा, प्राणी रुग्णालय, क्वारंटाईन एरिया व किचन, अंतर्गत हरित बागा, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, पुरातन वास्तू जतन व संवर्धन आदी विकास कामे करण्यात आली आहेत. याखेरीज पाणपोई, प्रसाधनगृहे, प्रेक्षागृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याच टप्प्यात हम्बोल्ट पेंग्विन कक्षही उभारण्यात आले आहे.

*  प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात वाघ, आशियाई सिंह, बिबटय़ा, तरस, लांडगा, देशी अस्वल, कोल्हा, चितळ, सर्पालय आदी प्राण्यांच्या पिंजऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे.