अधिकच्या ७ एकर जागेत विकासाची योजना; २०० कोटींचा खर्च करणार
भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) आणलेल्या आठ हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांवरून एकीकडे राजकीय पक्ष व प्राणी मित्र संघटनांकडून कडाडून विरोध होत असताना दुसरीकडे संग्रहालयात जिराफ, झेब्रा, बिबटे आणण्याची तयारी सुरू झाली आहे. लगतची मफतलाल कंपनीची ७ एकर जागा संग्रहालयाला देण्यात आली असून येथेच भविष्यात मोठे प्राणी पाहण्याची सुविधा निर्माण होणार आहे.
राणीच्या बागेतील नव्या परदेशी पाहुण्यांवरून राळ उडालेली असतानाच आता येथे जिराफ, झेब्रा आदी वन्य प्राणी येणार असल्याचे समजते आहे. हे प्राणी ठेवण्यासाठी संग्रहालयालगत ऐन मोक्याची ७ एकर जमीन देखील प्राप्त झाली आहे. येत्या दोन-तीन वर्षांत या जागेत मोठे प्राणी येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सगळ्याचा खर्च २०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. प्राण्यांची माहिती देणारे डीजीटल फलक, प्राणीजगत समजण्यासाठी इंटरप्रिटेशन सेंटर, अभ्यास सहली व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन आदी सुविधांची निर्मिती होणार आहे.
संग्रहालयाला लागूनच मफतलाल कंपनीची १४ एकर जमीन आहे. २०१५ साली मुंबई उच्च न्यायालयाने या जागेबाबतच्या सुनावणी दरम्यान यातील ७ एकर जागा प्राणी संग्रहालयाला द्यावी व उर्वरित ७ एकर जागा कंपनीच्या कामगारांसाठी ठेवावी असा निकाल दिला होता. त्यानंतर ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातही ही जागा संग्रहालयासाठी राखीव असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच, विकास आराखडय़ातही ही जागा संग्रहालयासाठी राखीव असल्याचे नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

जिराफ व झेब्रा आणण्याचा वेगळा प्रस्ताव केंद्रिय प्राणी संग्रहालयाकडे पाठवला असून तो मंजूर होण्याची शक्यता आहे. जिराफ व झेब्रा हे प्राणी भारतातील म्हैसूर, पटना, चेन्नई येथील प्राणी संग्रहालयात यापूर्वीच आले असून तेथे त्यांचे प्रजनन सुद्धा चालू आहे, असेही त्रिपाठी यांनी सांगितले.