News Flash

पेंग्विन कक्षाच्या विजेचा खर्च दरमहा १० लाख!

हा सर्व खर्च करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांमधूनच करण्यात आला.

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या आग्रहाखातर प्रशासनाने तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून आठ हम्बोल्ट पेंग्विन मुंबईत आणले.

करदात्यांच्या पैशांतून खर्चाला भाजपचा विरोध

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानातील (राणीची बाग) हॅम्बोल्ट पेंग्विनसाठी उभारण्यात आलेल्या कक्षातील केवळ विजेच्या बिलापोटी प्रशासनाला दरमहा १० लाख रुपये मोजावे लागत आहेत. आधीच या पेंग्विनसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले असताना आता या पेंग्विनच्या देखभालीवरही लाखो रुपये खर्च होत असल्याबद्दल भाजपने शिवसेना आणि महापालिका प्रशासन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. करदात्या मुंबईकरांच्या पैशांतून हा खर्च भागवला जात असताना पेंग्विन दर्शनासाठी उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांना दामदुपटीने शुल्क आकारणी करण्याच्या प्रस्तावालाही भाजपने विरोध केला आहे.

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या आग्रहाखातर प्रशासनाने तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून आठ हम्बोल्ट पेंग्विन मुंबईत आणले. पेंग्विनसाठी आधुनिक सुविधा आणि पेंग्विनसाठी आवश्यक ते तापमान राखण्याची सुविधा उपलब्ध असलेला कक्ष उभारण्यात आला. त्यावरही कोटय़वधी रुपये खर्च झाले. पेंग्विनसाठी उभारलेल्या कक्षासाठी दर महिन्याला वीज बिलापोटी पालिकेला १० लाख रुपये खर्च येत आहे. म्हणजे वर्षांकाठी १.२० कोटी रुपये पालिकेला भरावे लागणार आहे. त्याशिवाय राणीच्या बागेत अन्यत्र वापरण्यात येणाऱ्या विजेवरही मोठा खर्च पालिकेला करावा लागणार आहे.

हा सर्व खर्च करदात्या मुंबईकरांनी पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांमधूनच करण्यात आला. त्यातच आता राणीच्या बागेचे प्रवेशशुल्क वाढवण्याचाही प्रस्ताव पुढे येत

आहे, त्याला भाजप तीव्र विरोध करेल, अशी माहिती पक्षाचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी दिली.

पर्यटकांची संख्या १० लाखांवर

राणीच्या बागेत दाखल झालेल्या हम्बोल्ट पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी गेल्या साधारण तीन महिन्यांपासून पर्यटकांची गर्दी उसळू लागली आहे. सध्या शाळांना सुट्टी पडली आहे. त्यामुळे राणीच्या बागेत पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. पेंग्विन दर्शनाला येत्या १७ जून रोजी तीन महिने पूर्ण होत आहे. या तीन महिन्यांमध्ये राणीच्या बागेला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या १० लाखांवर जाईल, असा अंदाज पालिका आधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ४ लाख पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली होती.

.. तरीही पर्यटकांना ७० टक्के सवलत

राणीच्या बागेत ६० छोटी-मोठी उद्याने विकसित करण्यात आली आहेत. १० सेल्फी पॉइंट उपलब्ध करण्यात आले आहेत. दोन धबधबे सुरू करण्यात आले आहेत. प्राण्यांसाठी मोठे रुग्णालय उभे राहिले आहे. अशा अनेक गोष्टी केल्यानंतर राणीच्या बागेचे रूपडे बदलून गेले आहे. केवळ पेंग्विन दर्शनासाठी ही शुल्कवाढ करण्यात आलेली नाही. अनेक नव्या गोष्टींचा राणीच्या बागेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाला शुल्क वाढविणे भाग पडले आहे. असे असले तरी दोन लहान मुलांना घेऊन येणाऱ्या कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून त्यांच्याकडून केवळ १०० रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. अन्य प्राणिसंग्रहालयातील प्रवेश शुल्काचे दर विचारात घेण्यात आले होते. बागेच्या देखभालीवर येणारा खर्च लक्षात घेता पर्यटकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात ७० टक्के सवलत देण्यात आली आहे, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 4:32 am

Web Title: byculla zoo spending 10 lakh per month for electricity on penguins exhibit
Next Stories
1 अवजड वाहनांमुळे आरेमध्ये वाहतूक कोंडी
2 पश्चिम रेल्वेवर आठवडाभरात एसी लोकलची चाचणी
3 हाजी अली ट्रस्टला १.९० कोटी भरण्याचे आदेश
Just Now!
X