मुंबई : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला असून नव्या अभ्यासक्रमानुसार ५ हजार १२५ तर जुन्या अभ्यासक्रमानुसार ९ हजार ४४६ विद्यार्थ्यांना सनद देण्यात आली आहे.

नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत कोलकाता येथील अभय बजोरिया आणि नोएडा येथील सूर्याश अगरवाल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विजयवाडा येथील गुराम प्रणीथ हा देशात पहिला आला. तर मुलुंड येथील धवल चोपडा याने देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने नोव्हेंबर २०१९ मध्ये जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत कोलकाता येथील अभय बजोरिया आणि नोएडा येथील सूर्याश अगरवाल ८०० पैकी ६०३ गुण मिळवून देशात प्रथम आला. कोलकाता येथील ध्रुव कोठारी (५७७ गुण) याने दुसरे तर अहमदाबाद येथील दर्शन शहा (५७५ गुण)यांनी तिसरे स्थान पटकावले आहे. जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विजयवाडा येथील गुराम प्रणीथ (५७७ गुण) हा प्रथम आला आहे. मन्नरकड येथील वरदा के. पी. (५४८ गुण) पी दुसरी तर मुलुंड येथील धवल चोपडा (५३१ गुण) तिसरा आला आहे.

दृष्टिक्षेपात निकाल

नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी पहिल्या विषय गटाच्या (ग्रुप १) परीक्षेला २७ हजार ८६१ विद्यार्थी बसले होते त्यातील ४ हजार ८३० विद्यार्थी (१७.३४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेच्या तुलनेत निकाल ३ टक्क्यांनी वाढला आहे. दुसऱ्या विषय गटाच्या (ग्रुप २) परीक्षेला २६ हजार ९७२ विद्यार्थी बसले असून त्यातील ७ हजार ५९३ विद्यार्थी (२८.१५ टक्के) उत्तीर्ण झाले असून गेल्या परीक्षेच्या तुलनेत निकाल एका टक्क्याने वाढला आहे. दोन्ही विषय गटांची परीक्षा १५ हजार ३ विद्यार्थ्यांनी दिली असून  त्यातील २ हजार २६२ (१५.१२ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही गटांच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा टक्का घटला असला तरी प्रत्यक्षात अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यामुळे सनद मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ४ हजारांनी वाढली आहे.

जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चार ते पाच हजारांनी घटली आहे. पहिल्या विषय गटाची (ग्रुप १) परीक्षा २७ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील ७ हजार ३८४ विद्यार्थी (२६.९४ टक्के) उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल चार टक्क्यांनी घटला आहे. दुसऱ्या विषय गटाची (ग्रुप २) परीक्षा ३७ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील ८ हजार ३४८ विद्यार्थी (२३.०९ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषय गटांची परीक्षा ८ हजार २१ विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील ८१७ (१०.१९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल पाच टक्क्यांनी घसरला आहे.

जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत देशात तिसरा आलेला धवल चोपडा हा मुंबईतील शासकीय विधि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. ‘सीए’ इंटरमिजिएट परीक्षेतही त्याने देशांत आठवा क्रमांक पटकावला होता. ‘सीए’ करतानाच गेल्यावर्षी त्याने विधि अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. ‘मी रोज जवळपास दहा तास अभ्यास करत होतो. परीक्षेच्या आधी काही महिने आम्ही मित्र एकत्र अभ्यास करायचो. त्याचा खूप फायदा झाला. मला वकिली करण्याची इच्छा आहे. करप्रणाली आणि लेखापरीक्षण अशा अनुषंगिक विषयांची माहिती वकिलांना नसते, त्यासाठी मी सीएची परीक्षा दिली,’ असे धवल याने सांगितले.