भाजप सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या(एनपीआर) माध्यमातून देशात दुही माजवली आहे. ब्रिटिशांप्रमाणे भाजपही हिंदू-मुस्लीमांना आपआपसात लढवण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र देशभर सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करून भाजपचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा निर्धार शनिवारी मुंबईत ६५ संघटनांनी आयोजित केलेल्या महामोर्चात करण्यात आला.

देशाची तिजोरी रिती करू पाहाणारा, जाती किंवा धर्म भेदाला वाव देणारा, अल्पसंख्यांकांसह बहुजन आणि गोर-गरिबांना वंचित ठेवणारा आणि शेजारील राष्ट्रांमधील विस्थापितांना नाकारणारा कायदा रद्द करावा, ही  मागणी महामोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. एनपीआर, एनआरसी रद्द करण्यात यावे, सीएए, एनपीआर आणि एनआरसीविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्याही या मंचावरून करण्यात आल्या.

विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी राष्ट्रीय आघाडी’ने  आझाद मैदान येथे महामोर्चा काढला होता.  आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी नायर, प्रदेशाध्यक्ष निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड, अभिनेता सुशातसिंग राजपूत उपस्थित होते. आंदोलनाची पुढील भूमिका १९ फेब्रुवारीला जाहीर केली जाईल, असे महामोर्चाच्या आयोजकांनी जाहीर केले.  देशात तिरस्काराची भावना वाढवण्यासाठी केंद्र सरकार सीएए, एनआरसी, एनपीआर कारणीभूत आहे. प्रत्यक्षात सर्व धर्म, जातींनी एकोप्याने नांदावे, ही  नागरिकांची भावना आहे. त्यामुळे तिरस्काराने नव्हे तर प्रेमाने, विश्वासाने सरकारच्या भूमिकेचाविरोध केला जाईल, अशी भूमिका मौलाना अजीज जलील यांनी मांडली.