रत्नागिरी जिल्ह्य़ातील गडनदी मध्यम प्रकल्पाच्या ९५० कोटी ३७ लाख रुपये इतक्या किमतीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या माध्यमातून या वाढीव खर्चास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे संगमेश्वर तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे.

गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या कुचांबे येथे गडनदीवर ८३.२१२ द.ल.घ.मी. क्षमतेच्या धरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये करण्यात आला असून धरणाच्या बुडीत क्षेत्रालगतच्या संगमेश्वर तालुक्यातील ३९३  हेक्टर क्षेत्रासाठी उपसा सिंचन योजना नियोजित करण्यात आली आहे.

या प्रकल्पांतर्गत ४७ कि.मी.च्या उजव्या कालव्याद्वारे चिपळूण तालुक्यातील १० गावांतील १३६६ हेक्टर, संगमेश्वर तालुक्यातील ५ गावांमधील ५२० हेक्टर आणि २७ कि.मी.च्या डाव्या कालव्याद्वारे संगमेश्वर तालुक्यातील ६ गावांतील ८३२ हेक्टर याप्रमाणे एकूण ३१११ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

या प्रकल्पास १९८२-८३ च्या दरसूचीवर आधारित १० कोटी ३७ लाख रुपये इतक्या रकमेस मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर १९९८-९९ च्या दरसूचीवर आधारित ११२ कोटी ८० लाख इतक्या रकमेस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २००७-०८ मध्ये ४१९ कोटी ८१ लाख रुपये इतक्या रकमेस द्वितीय सुप्रमा  आणि २००९-१० मध्ये ६५१ कोटी ४२ लाख रुपये इतक्या रकमेस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रस्तावानुसार २०१३-१४ च्या दरसूचीवर आधारित ९५० कोटी ३७ लाख रुपयांच्या किमतीस बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या रकमेपैकी ९०९ कोटी ५० लाख रुपये मुख्य कामासाठी आणि ४० कोटी ८७ लाख रुपये इतर खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे.