15 October 2019

News Flash

सत्तेच्या वाटपाचे सूत्र निवडणुकीनंतर – पाटील

मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती शिवसेनेला नाहीत

(संग्रहित छायाचित्र)

उमाकांत देशपांडे

भाजप-शिवसेना युतीमध्ये केवळ जागावाटपाचाच तिढा नसून निम्म्या जागांसह मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समान वाटपाचाही शिवसेनेचा आग्रह कायम आहे. भाजप मात्र मुख्यमंत्रिपद सोडाच, तर उपमुख्यमंत्रिपद किंवा महत्त्वाची खातीही देण्यास तयार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात ‘लोकसत्ता’ बोलताना मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समान वाटपाच्या मुद्दय़ाचा निवडणूक निकालानंतर विचार होईल. ते कसे करायचे, यावर नंतर निर्णय होईल. आधी जागावाटपाबाबत निर्णय घेतला जाईल, त्याबाबत अजून सहमती झालेली नाही, असे स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीआधी भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली. तेव्हा विधानसभेतही युती होईल आणि उभयपक्षी सत्तेचे समान वाटप होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यामुळे निम्म्या जागांसह अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद, महत्त्वाच्या खात्यांसह निम्मी खाती मिळावीत आणि सत्तावाटपाचा निर्णयही विधानसभेसाठी युतीची घोषणा करताना व्हावा, असा शिवसेनेचा आग्रह आहे. भाजपची मात्र राज्यात ताकद वाढल्याने आक्रमक असून युतीमध्ये पूर्वी शिवसेनेकडे १७१ जागा व भाजपकडे ११७ हे जुने सूत्र उलट करण्याच्या तयारीत आहे. भाजपने तसाच प्रस्ताव शिवसेनेकडे दिला असून तो स्वीकारून भाजप आता मोठा भाऊ हे मान्य केले आणि मुख्यमंत्रिपदासह नगरविकास, अर्थ, गृह व महसूल खात्याचा आग्रह शिवसेनेने सोडला, तर युती होऊ शकेल, असे भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांच्यात थेट चर्चा होत असून शिवसेनेने १३५ जागांचा आग्रह धरला आहे. मात्र भाजपने त्यास नकार दिला आहे.

युतीची घोषणा घटस्थापनेच्या दिवशी होणार का, असे विचारता प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, तोपर्यंत थांबता येणे कठीण आहे असे पाटील यांनी स्पष्ट केले.

First Published on September 23, 2019 1:41 am

Web Title: cabinet distribution after election says chandrakant patil abn 97