राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी ३० डिसेंबरला होणारा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आतच उरकण्याची सूचना राजभवनाकडून राज्य सरकारला मिळाल्याचे समजते. यामुळे रात्री राष्ट्रपती राजवट उठवण्याची लगबग करणाऱ्या राजभवनला दुपारी दोनच्या आत शपथविधी उरकण्याची घाई का, अशी चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये रंगली आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला होणार आहे. तसे पत्रही राजभवनला पाठवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत संपवावा, अशी तोंडी सूचना राजभवनवरील राज्यपाल कार्यालयाकडून आल्याचे समजते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या शपथविधीसाठी रात्रभरात सर्व प्रक्रिया राबवल्या होत्या. मग आता दुपारी दोनपर्यंत कार्यक्रम का उरकायचा आहे, अशी चर्चा मंत्रिमंडळातील सदस्यांमध्ये रंगली आहे.

मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दुपारी एकची वेळ मागणारे पत्र राज्यपाल कार्यालयाला मिळाले असून, राज्यपालांच्या सूचनेनुसार त्यास उत्तर देण्यात येईल, असे राज्यपालांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. सरकारच्या सोयीनुसार शपथविधीची वेळ दिली जाते. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहकारी मंत्र्यांच्या शपथविधीसाठीही त्यांनी सुचवल्यानुसार वेळ दिली होती, असे या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

एका तासात कार्यक्रम कसा उरकणार?

मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात दुपारी एकची वेळ मागण्यात आली आहे. त्यामुळे दुपारी एक वाजता शपथविधी सुरू झाल्यावर जवळपास तीस जणांचा शपथविधी एका तासात कसा उरकायचा, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला आहे.