निलेश अडसूळ

सुरक्षित अंतराच्या नियमामुळे भाविकांना यंदा सार्वजनिक गणेशोत्सवात प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य नसल्याने अनेक मंडळांनी ऑनलाइन दर्शनाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यापैकी धनिक मंडळांनी स्थानिक केबल वितरकांशी संपर्क साधून विभागवार गणेश दर्शनाची सोय केली आहे. परंतु त्यासाठीचा लाखोंचा खर्च परवडत नसल्याने अनेक मंडळे समाजमाध्यमांकडे वळली आहेत.

सालाबादप्रमाणे उत्सवाचा थाट नसला तरी अनेक मंडळांनी आकर्षक मूर्ती, आटोपशीर सजावटीवर भर दिला आहे. हे भाविकापर्यंत पोहोचविण्यासाठी केबल नेटवर्क आणि समाज माध्यम हे दोन पर्याय प्रकर्षांने पुढे येत आहेत. गणेश मंडपातील थेट प्रक्षेपण केबलद्वारे दाखवणे परवडणारे नाही. कारण थेट प्रक्षेपणासाठी यंत्रणा, कॅमरे, ते हाताळणारे छायाचित्रकार, इंटरनेटची जोड, एलइडी स्क्रीन्स, प्रसारण यांचा एकंदर खर्च दीड ते दोन लाखांच्या आसपास आहे. त्यातही मागणीनुसार अंदाजे १० लाखांपर्यंत हा खर्च जाऊ शकतो, अशी माहिती केबल वितरकांनी दिली.

मुंबईतील ‘लालबागचा राजा’ यंदा विराजमान होणार नसला तरी आरोग्योत्सव मात्र घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी ‘साई व्हिजन’ हे स्थानिक केबल वितरक दरवर्षीप्रमाणे याही वर्ष पार पाडणार आहे. त्यासाठी चहुबाजूंनी कॅमेरे लावले जातील. या बरोबरच समाजमाध्यमांवर प्रक्षेपण केले जाईल. या भव्य यंत्रणेला साधारण दहा लाखांच्या आसपास खर्च येतो, अशी माहिती साई व्हिजनच्या प्रतिनिधींनी दिली. परंतु सेवा म्हणून मंडळाकडून पैसे आकारात नसल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ यांनी गणेशाची पूजा, रक्तदान आणि सामाजिक उपक्रम भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करणार असल्याचे सांगितले. शिवाय स्थानिक केबल वितरकांशीही प्राथमिक बोलणी झाल्याचे मंडळाचे सचिव उमेश नाईक म्हणाले. भायखळ्यात ‘लव्ह लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने विभागातील लोकांना सहज दर्शन व्हावे, यासाठी जीटीपीएल आणि हॅथवे या मुंबईतील केबल नेटवर्कशी संपर्क साधून सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे. यासाठी मंडळाला सव्वा लाखांच्या आसपास खर्च आला आहे. हा खर्च कमी करण्यासाठी मंडळांनी जाहिरातींचा आधार घेतला आहे.

समाजमाध्यमांचा आधार

थेट प्रक्षेपणाचा खर्च न परवडणाऱ्या मंडळांनी फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या माध्यमांचा आधार घेऊन दिवसातून ठराविक वेळ थेट प्रक्षेपणासाठी दिला आहे. आरती, प्राणप्रतिष्ठापना, गणेश विधी, सामाजिक कामे अशा निवडक गोष्टींचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. तर दादर येथील गणेश उद्यान समिती संकेतस्थळावर हे प्रदर्शित करेल. केबल प्रक्षेपणाचा खर्च झेपणारा नसल्याने समाजमाध्यमांचा आधार घेतल्याचे धारावीतील शिवशक्ती सेवा मंडळाचे अध्यक्ष विशाल माने यांनी सांगितले.