टाळेबंदीमुळे वसुलीत ८० टक्क्यांची घट 

मुंबई : करोनामुळे देशभर लागू के लेल्या टाळेबंदीमुळे केबलचालकांच्या वसुलीत ८० टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. केबलचालकांकडील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी महिन्याकाठी ग्राहकांकडून केबल शुल्काची वसुली करण्यास अडचण येत आहे. तसेच अनेक इमारतीत बाहेरील व्यक्तींना मनाई के ल्यानेही ग्राहकांच्या समस्या सोडवणे कठीण झाले आहे. ग्राहकांकडून वेळेवर केबल शुल्काची वसुली न झाल्याने केबलचालकांना स्वत:च्या खिशाला कात्री लावावी लागत आहे.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे केबलचालकांना ग्राहकांकडून केबल शुल्काची वसुली करण्यात अडचणी येत आहेत. दहा-पंधरा दिवसांच्या कालावधीत केबलचालकांच्या वसुलीत ८० टक्क्यांनी घट झाल्याचे महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनकडून सांगण्यात आले. ‘माझ्याकडे सहा मुले कामाला होती. मात्र टाळेबंदीमुळे सध्या दोनच मुले येत आहेत.

यामुळे ग्राहकांच्या केबलशी निगडित अडचणी सोडवण्यास त्रास होत आहे. काही इमारतीतही प्रवेश नाकारला जात असल्याने मुलांना वसुली करता येत नसल्याचे केबलचालक बॉबी शाह यांनी सांगितले.  केबलचालकांना ग्राहकांकडून वेळेवर शुल्क मिळत नसल्याने एमएसओना (मल्टिसिस्टीम ऑपरेटर) देण्यासाठी पैसे जमा करायचे कसे, असा प्रश्न आहे.

वेळेवर पैसे न दिल्याने केबल सेवा बंद पडण्याची शक्यता आहे. केबलचालकांना स्वत:च्या खिशातील पैसे द्यावे लागत आहेत. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनने ग्राहकांना ऑनलाइन शुल्क तसेच मोफत वाहिन्या पाहण्याचे आवाहन के ले आहे.

ग्राहकांनी आवडत्या वाहिन्यांची यादी केबलचालकांकडे द्यावी, त्यानुसार त्यांना वाहिन्या उपलब्ध करून दिल्या जातील असेही महाराष्ट्र केबल ऑपरेटर संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी सांगितले आहे. टाळेबंदीनंतर दोन ते तीन महिन्यांत शुल्क  भरावे. नंतर शुल्क भरल्यास ग्राहकांकडून अतिरिक्त तीस रुपये आकारले जातील असेही त्यांनी स्पष्ट के ले.

पोस्टपेड पैसे भरण्याची मागणी

केबलचालक एमएओना महिन्याकाठी ठरावीक रक्कम देतात. मात्र एमएसओ ब्रॉडकास्टर्सना साधारण दोन महिन्यांनंतर रक्कम (पोस्टपेड) अदा करतात. एमएसओनी महिन्याचा अहवाल बनवल्यावर त्यांना ब्रॉडकास्टर्सना पैसे द्यावे लागतात. ग्राहकांकडून पैसे न मिळाल्याने केबलचालकांना एमएसओना पैसे देणे अशक्य झाले आहे. या संदर्भात केबलचालकांच्या संघटनांनी ट्राय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि संबंधित एसएमओ यांना पोस्टपेड पैसे भरण्याची मागणी के ली आहे.