|| स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ

थेट ग्राहक सेवेमुळे लाखोंवर बेकारीची धास्ती

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने आणलेल्या ‘जिओ’मुळे अनेक नामांकित राष्ट्रीय मोबाइलसेवा कंपन्यांचे जगणे आणि तगणे कठीण झाले असतानाच सर्वसामान्यांच्या घरात विविध दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इंटरनेट सेवा पुरवणारे केबल चालकही बेकारीच्या भीतीने धास्तावले आहेत. या व्यवसायात लाखो तरुण असून त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती असल्याने जिओविरोधात त्यांचा संघर्ष अटळ झाला आहे.

स्थानिक केबल व्यवसायिकांना बाजूला ठेवून थेट ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याची ‘जिओ’ची योजना आहे. त्यामुळे आपली आणि आपल्याकडील कर्मचाऱ्यांची रोजीरोटी धोक्यात येईल, अशी केबलचालकांची भावना आहे.

‘जिओ’ थेट ग्राहकांपर्यंत गेल्यास सेवासाखळी धोक्यात येऊन मुंबईतच लाखांहून अधिक लोकांचा रोजगार धोक्यात येईल. सुरुवातील ‘जिओ’ मोफत सेवा देईल. पण एकदा मक्तेदारी निर्माण झाली की मनमानी दर लावणार नाही, विशिष्ट वाहिन्याच माथी मारणार नाही, याची कसलीही शाश्वती नाही. आज केबलचालकांकडून कोटय़वधींचा कर जीएसटीच्या रूपात सरकारी तिजोरीत जमा होत आहे. ‘जिओ’ने सुरुवातीला मोफत पॅकेजचे आमिष दाखवले आहे. त्यामुळे कसलाही कर जमा होणार नाही. मात्र त्याचवेळी अनामत रकमेच्या नावाखाली प्रत्येकी ४५०० रुपये घेऊन रिलायन्स कंपनी अब्जावधी रुपये गोळा करेल. त्यावर कसलाही कर त्यांना द्यावा लागणार नाही. हे सारे ‘जिओ’च्या कारभाराचे धोके आहेत, असे शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे सदस्य वीरेंद्र जाधव म्हणाले की, ‘‘माझ्याकडे जवळपास ७०० ग्राहक आणि सात कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १२ ते १५ हजार पगार द्यावा लागतो. पगार जाऊन महिन्याकाठी चांगले उत्पन्न होते. ‘जिओ’मुळे आमचा व्यवसायच धोक्यात येणार अशी चिन्हे आहेत. त्यामुळे दोन आठवडय़ांपूर्वी आम्ही गोरेगावातील सिद्धार्थनगर येथे एकता टॉवरजवळ ‘जिओ’ची वाहिनीच तोडून टाकली. दुसरा इलाजच नाही. प्रकरण पोलिसांत जात होते पण ‘जिओ’च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संवादातून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आणि प्रकरण मिटले.’’

सेना-मनसेही रस्त्यावर

या क्षेत्रात मराठी तरुण मोठय़ा प्रमाणात असल्याने मनसे-शिवसेनेने या प्रश्नात हात घातला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेच्या पुढाकारातून काही केबलचालकांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. स्थानिक केबलचालकांमार्फतच ‘जिओ’ने व्यवसाय करावा, अशी मनसेची भूमिका असून केबलचालकांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले. त्यानंतर आता शनिवारी ‘केबल ऑपरेटर, डिस्ट्रीब्युटर असोसिएशन’ने केबलचालकांचा मेळावा ठेवला असून उद्धव ठाकरे त्यास उपस्थित राहणार आहेत.

केबल व्यवसायाची व्याप्ती..

  • मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे नऊ हजार केबलचालक आहेत.
  • त्यांच्यामार्फत शंभरपासून ते एक हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना केबलसेवा दिली जाते.
  • छोटय़ा केबलचालकांकडे पाच-सात कर्मचारी असतात. तर मोठय़ांकडे एकूण व्यवसायाच्या व्याप्तीनुसार १५ ते २५ कर्मचारीही असतात.
  • त्यातून मुंबईत सुमारे ९० हजारांहून अधिक कर्मचारी या क्षेत्रात आहेत.

साखळी धोक्यात

या केबल साखळीत प्रथम प्रक्षेपक (सोनी, झी आदी वाहिन्या) असतात. मग बहुविध यंत्रणा चालक (मल्टिसिस्टीम ऑपरेटर म्हणजेच हॅथवे, सिटी केबल, इन केबल यासारख्या कंपन्या) येतात. त्यानंतर स्थानिक केबलचालक (लोकल केबल ऑपरेटर) येतात. याशिवाय बहुविध यंत्रणा चालक हे आपल्या सोयीसाठी वितरक नेमतात. मात्र जिओमुळे हॅथवे, सिटी केबलसारख्या बहुविध कंपन्या बाजूला पडतीलच पण वितरक, स्थानिक केबलचालक ही साखळीही नष्ट होऊ शकते, असे केबलचालकांचे म्हणणे आहे.