05 August 2020

News Flash

कॅफे, उपाहारगृहांत ‘स्टार्टअप’ची कार्यालये!

एवढेच नव्हे तर, अशा प्रकारच्या जागांची माहिती देणारे अ‍ॅपही विकसित होऊ लागले असून तोही व्यवसायाचा नवा प्रकार बनला आहे.

|| मानसी जोशी

व्यवसायासाठी जागा भाडय़ाने घेण्याऐवजी ‘को-वर्किंग’ संकल्पना

मुंबई : कोणताही नवा व्यवसाय-उद्योग सुरू करायचा म्हटलं की, पहिला प्रश्न येतो तो जागेचा. मुंबई, ठाणे यांसारख्या महानगरांत जागांचे वाढलेले भाव आणि न परवडणारे भाडे यामुळे व्यवसायासाठी जागा शोधण्यातच वेळ खर्च होतो. मात्र, नवनवीन संकल्पनांवर आधारित उद्योग सुरू करणाऱ्या नवउद्यमींनी यावरही अभिनव उपाय शोधून काढला आहे. आपल्या ‘स्टार्टअप’साठी कार्यालयाचा शोध घेण्याऐवजी ही मंडळी एखाद्या कॅफे, उपाहारगृह किंवा मोठय़ा व्यावसायिक जागेत एकत्रितपणे कार्यालये थाटत आहेत.

चोवीस तास इंटरनेटची सुविधा, आरामदायी वातावरण, या कारणांमुळे अनेक तरुण मंडळी व्यावसायिक काम आणि बैठका कॅफे आणि रेस्तराँमध्ये घेऊ लागली आहेत. त्याचप्रमाणे ‘को-वर्किंग’च्या (सह-कार्यालये) माध्यमातून मोठय़ा व्यावसायिक जागेत एकापेक्षा अधिक स्टार्टअपची मंडळी एकत्रपणे काम करताना दिसू लागली आहेत. एवढेच नव्हे तर, अशा प्रकारच्या जागांची माहिती देणारे अ‍ॅपही विकसित होऊ लागले असून तोही व्यवसायाचा नवा प्रकार बनला आहे.

नवउद्यमींची पसंती

व्यवसायासाठी भांडवल हा कळीचा मुद्दा असतो. स्थिरस्थावर असलेल्या उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यवसायासाठी जागा शोधणे हे कठीण काम असते; पण त्याहूनही कठीण काम स्टार्टअपसाठीच्या भांडवलाचा मोठा भाग जागेकरिता गुंतवणे, हे असते. अनेक नवउद्यमींना अशी गुंतवणूक परवडत नाही. यावर उपाय म्हणून ही मंडळी आपल्या कामकाजासाठी कॅफे, रेस्तराँ यांचा उपयोग करू लागली आहेत. अनेक उपाहारगृहे अशा प्रकारच्या व्यावसायिक कामांसाठी टेबल किंवा ठरावीक जागा भाडय़ाने देऊ लागली आहेत.

विशेष म्हणजे, या ठिकाणी उपलब्ध असलेले इंटरनेट, चहा-कॉफी किंवा अल्पोपाहाराची सोय आणि कॅफेमधील तरुणाईने भारलेले वातावरण यामुळे नवउद्यमीही अशा जागांना पसंती देत आहेत. हैदराबाद, चेन्नई, मुंबई, दिल्ली, बंगळूरु या शहरांत सध्या छोटय़ा जागा भाडय़ाने देण्याचा उद्योग वाढत आहे. जागेनुसार प्रति चौरस फुटाचे दर बदलत असून दहा ते पंधरा हजारांपासून सुरू होतात.

छोटय़ा जागा भाडय़ाने देण्याचा उद्योग तेजीत

हैदराबाद, चेन्नई, मुंबई, दिल्ली, बंगळूरु या शहरांत सध्या छोटय़ा जागा भाडय़ाने देण्याचा उद्योग वाढत आहे. जागेनुसार प्रति चौरस फुटाचे दर बदलत असून दहा ते पंधरा हजारांपासून सुरू होतात. मोठी जागा असल्यास एकाच जागेत अनेक क्षेत्रांचे व्यावसायिक आपले काम करतात. या अ‍ॅपवर दर तासाप्रमाणे शुल्क आकारले जातात.

.. त्यासाठी जागा पुरेशी

प्रिणीत शिळीमकर याचे ‘फिटनेसटॉक’ नावाने स्टार्टअप असून आहार आणि आरोग्यासंदर्भात ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी कॅफे ही उत्तम जागा असल्याचे तो सांगतो. ‘ड्रीमफ्लेयर’ कंपनीचा सदस्य असलेल्या हृषीकेश मराठे यानेही या जागा सोयीस्कर असल्याचे सांगितले. ‘‘आमचे नवीन स्टार्टअप असून कंपन्यांना समाजमाध्यमावर आपले प्रोफाइल कसे ठेवावे या संदर्भात कंपनी, व्यावसायिक यांना मार्गदर्शन करतो. या कामासाठी कॅफे किंवा रेस्तराँमधील जागा पुरेशी असते,’’ असे तो म्हणाला.

‘जागा’ दाखवणारे अ‍ॅप

अशा प्रकारच्या ‘को-वर्किंग’च्या संकल्पनेला जोड देणारा नवीन व्यवसायही आता रुजू लागला आहे. व्यावसायिक कामासाठी पुरेसा वेळ देणाऱ्या शहरातील कॅफे आणि उपाहारगृहांची माहिती देणारी अ‍ॅपही बाजारात उपलब्ध होत आहेत. नुकतेच अभिनय देवने ‘प्रायमस को वर्क’ नावाने सुरू केलेल्या अ‍ॅपमध्ये कुलाबा, नरिमन पॉइंट, अंधेरी, मुलुंड, दादर या भागांतील कॅफे आणि रेस्टॉरंट्सची माहिती देण्यात आली आहे. एक ठरावीक शुल्क भरून जवळच्या कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये काम करता येऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:04 am

Web Title: cafes startup offices in the restaurant akp 94
Next Stories
1 विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी
2 टीव्ही ब्रॉडकास्टर्सना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
3 काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
Just Now!
X