18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

ठाणे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे कॅगकडून वाभाडे

घनकचऱ्याचा उलटा प्रवास तर शस्त्रक्रियागृहही धूळ खात

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: August 13, 2017 1:16 AM

Thane Municipal Corporation ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

घनकचऱ्याचा उलटा प्रवास तर शस्त्रक्रियागृहही धूळ खात

ठाण्यात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिकेने अविवेकी व्यवस्थापनाची पद्धत अवलंबल्यामुळे महापालिकेस कोटय़वधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. त्याचप्रमाणे योग्य नियोजनाअभावी सुमारे १३ कोटी रुपये खर्चून आधुनिकीकरण करण्यात आलेल्या कळवा रुग्णालयातील काही शस्त्रक्रियागृहही कर्मचाऱ्यांअभावी गेल्या चार वर्षांपासून धूळ खात पडल्याचे उघडकीस आणत भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) महापालिकेच्या कारभाराचे पुरते वाभाडे काढले आहेत.

ठाणे शहरातील १० प्रभाग समित्यांमध्ये दररोज निर्माण होणारा शेकडो टन घनकचरा महापालिका खर्डी गाव दिवा येथील कचराभूमीत टाकते. या कचऱ्याची विल्हेवाट लावताना महापालिकेने दोन प्रकारची यंत्रणा उभारली आहे. शहरातील सुमारे १५० कचरा कुंडय़ा तसेच घराघरातून गोळा होणारा कचरा छोटय़ा घंटागाडीद्वारे (कॉम्पॅक्टर्स) थेट वागळे विभागातील सीपी तलाव येथील रिफ्युज ट्रान्स्फर स्थानकात (आरटीएस) आणला जातो त्यासाठी कंत्राटदाराला एका फेरीसाठी सात हजार १०० रुपये दिले जातात. तेथे हा कचरा एकत्र केल्यानंतर तो दुसऱ्या ठेकेदारामार्फत थेट दिवा येतील कचराभूमीत टाकला जातो. त्यासाठी ठेकेदारास प्रति मेट्रिक टन २९० रुपये दिले जातात. सीपी तलाव ते दिवा कचराभूमी हे अंतर २० किलोमीटर असून मुंब्रा ते दिवा हे अंतर अवघे सात किलोमीटर आहे. त्यामुळे मुंब्रा प्रभाग समितीमधील कचरा दिव्याला नेणे आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर असतानाही महापालिका मात्र मुंब्रा विभागातील कचऱ्याचा प्रवास आधी सीपी तलाव येथे आणि तेथून पुन्हा मुंब्रा मार्गे दिवा असा केला जातो. महापालिकेच्या अविवेकी नियोजनामुळे गेल्या चार वर्षांत ठेकेदाराचा दीड कोटींचा फायदा झाल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे.

अशाच प्रकारे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे १३.३२ कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले. मात्र त्यातील सहा कोटी रुपये खर्चून आधुनिकीकरण करण्यात आलेली शस्त्रक्रियागृह कर्मचाऱ्याची नियुक्ती न करण्यात आल्याने गेल्या चार वर्षांपासून सुरूच होऊ शकले नसून ते सध्या धूळ खात पडून असल्याचेही कॅगने नमूद केले आहे.

First Published on August 13, 2017 1:16 am

Web Title: cag comment on thane municipal corporation