ट्रायच्या सल्लापत्रात सूचना
मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये होणारे मोबाइल कॉल ड्रॉपचे पैसे आता कंपन्यांकडून वसूल केले जाणार आहेत. इतकेच नव्हे तर पहिल्या पाच सेकंदात जर कॉल ड्रॉप झाला तर कंपनी ग्राहकाकडून त्या कॉलसाठी एक पैसाही वसूल करू शकणार नाही. अशा नियमांमुळे एरवी ग्राहकांच्या कॉल ड्रॉपकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांना चांगलीच जरब बसणार आहे.
कॉल ड्रॉपच्या संदर्भात ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’ (ट्राय)ने केलेल्या अभ्यासात परिस्थिती खूप गंभीर असल्याचे समोर आले. याची दखल घेत दूरसंचार मंत्रालयाने हे सर्व रोखण्यासाठी काही नियमावली करता येईल का अशा सूचना ‘ट्राय’ला दिल्या होत्या. यानुसार ‘ट्राय’ने शनिवारी एक सल्लापत्र प्रसिद्ध केले. या सल्लापत्रात कॉल ड्रॉप का होतात हे सांगत असतानाच कॉल ड्रॉप झाल्यावर काय नियम असावे हेही सुचविले आहे. पहिल्या पाच सेकंदांमध्ये कॉल ड्रॉप झाला तर मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणारी कंपनी ग्राहकाला त्या कॉलसाठीचे पैसे आकारू शकणार नाही.
तसचे ग्राहक फोनवर बोलत असताना त्याचे बोलणे ३ मिनिटे ४५ सेकंद झाले आणि कॉल ड्रॉप झाला तर मोबाइल नेटवर्क पुरविणारी कंपनी ग्राहकाला केवळ तीन मिनिटांचे दर आकारू शकणार आहे. वरील ४५ सेकंदांचे दर कंपनीला आकारता येणार नाहीत. याचबरोबर अमेरिका, बांग्लादेश, थायलंड आणि पाकिस्तान या देशांमध्ये कॉल ड्रॉप्सच्यासमोर ग्राहकांना ‘क्रेडिट टॉक टाइम’ दिला जातो. म्हणजे जर कॉल ड्रॉप झाला तर ग्राहकाला अतिरिक्त टॉक टाइम दिला जाईल. पाकिस्तानमधील मोबिलिंक या कंपनीने ‘मिनिट बॅक ऑप कॉल ड्रॉप’ ही सुविधा सुरू केली आहे. म्हणजे जर कॉल ड्रॉप झाला तर ग्राहकाला अतिरिक्त मिनिट दिला जातो. कंपनीकडून तुम्हाला अतिरिक्त मिनिट मिळाला तर तो वेळ २४ तासांच्या आत संपवणे ग्राहकांना बंधनकारक असेल.
या सल्लापत्रावर काही सूचना आणि हरकती असल्यास २१ सप्टेंबपर्यंत त्या ‘ट्राय’कडे ं५्रि२१ऋीं1@३१ं्र.ॠ५.्रल्ल या ई-मेय आयडीवर किंवा ट्रायच्या संकेतस्थळावर नोंदविता येऊ शकतील.