‘अरे.. बोलता बोलता फोन कट झाला’, ‘किती वेळ झाला व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज पाठवून, जातच नाहीए..’ असे संवाद सध्या वारंवार ऐकू येतात. मोबाइल नेटवर्कच्या मुंबई वर्तुळातील अनेक भागात मोबाइल रेंजची समस्या निर्माण होऊ लागली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या काळात या वर्तुळात सेवा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांच्या तब्बल ८०१ टॉवरची सेवा खंडीत झाली आहे. परिणामी ‘कॉल ड्रॉप’ होणे, वेळेवर संदेश न पोहचणे अशा तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे.
मोबाइल टॉवरमधून होणारा किरणोत्सर्ग आरोग्यास घातक असून, त्यामुळे कर्करोगासारखे दुर्धर आजार होऊ शकतात हे निरीक्षण समोर आल्यापासून सोसायटय़ांवर मोबाइल टॉवर लावण्यासाठी परवानगी देणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. शहरात कित्येक हजार टॉवर पुन्हा परवानगी मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत तर अनेक टॉवरची सेवाही खंडीत करण्यात आली आहे. ‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा’ने (ट्राय) जूनमध्ये दोन दिवस मुंबई वर्तुळात सेवा पुरविणाऱ्या मोबाइल कंपन्यांची चाचणी घेतली. यानंतर सादर केलेल्या अहवालात फोन गळती तसेच घटती टॉवरची संख्या, याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मोबाईल टॉवरमधील किरणोत्सर्गाचा आरोग्यास धोका असल्याने नागरिकांच्या मनात भीती आहे. यामुळे अनेक सोसायटय़ा टॉवर लावण्यास परवानगी देत नाहीत. तसेच ज्या सोसायटय़ांमध्ये टॉवर आहेत त्या नव्या करारास नकार देत आहेत. यामुळे मुंबई वर्तुळात ८०१ टॉवरची सेवा खंडीत झाली आहे. हीच आकडेवारी दिल्ली वर्तुळात ५२३ आहे. याचबरोबर कंपन्यांनी खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमच्या वाटपामध्येही विलंब होत असल्याने सेवेत अडचणी येत आहेत. मोबाइल टॉवरबाबत चिंता व्यक्त करताना कॉल ड्रॉपच्या नियमनाबाबत स्वतंत्र अभ्यासपत्र सादर करण्याची गरज असल्याचे ‘ट्राय’ने अहवालात म्हटले आहे.
सेवा खंडीत झालेले टॉवर

कंपनी टॉवरची
संख्या
एअरसेल १०३
एअरटेल १२८
आयडिया २३१
रिलायन्स ३८
टीटीएसएल २४९
वोडाफोन ३८
एमटीएनएल १४
एकूण ८०१