25 November 2020

News Flash

‘फोर्सवन’मधील कमांडोची आत्महत्या

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील ‘फोर्स वन’मधील एका कमांडोने स्वत:च्या सव्‍‌र्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून शुक्रवारी पहाटे आत्महत्या केली.

| April 27, 2013 05:02 am

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील ‘फोर्स वन’मधील एका कमांडोने स्वत:च्या सव्‍‌र्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून शुक्रवारी पहाटे आत्महत्या केली. नंदलाल सोनावणे (२५) असे या पोलिसाचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मे महिन्यात सोनावणेचे लग्न होणार होते. वैयक्तिक कारणामुळेच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.
कालिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सोनावणे कमांडोचे प्रशिक्षण घेत होता. शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास पोलीस कॅम्पच्या गच्चीवर जाऊन त्याने स्वत:कडील रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. या आवाजाने त्याच्या काही सहकाऱ्यांनी तात्काळ गच्चीवर धाव घेतली आणि त्याला त्वरित रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोनावणेच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी सांगितले. त्याने आत्महत्येपूर्वी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहून ठेवलेली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोनावणे हा मुळचा धुळे जिल्ह्यातील होता. त्याचा साखरपुडा झाला होता आणि मे महिन्यात त्याचे लग्न होणार होते. परंतु सोनावणेचा भावी पत्नीशी काहीतरी कारणावरून वाद होता. तिला पाठविण्यासाठी त्याने काही लघुसंदेश त्याने टाईप करून ठेवले होते. परंतु ते पाठवले नव्हते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. भावी पत्नीशी झालेला वाद हेच आत्महत्येमागील कारण असावे, अशी शक्यता त्याच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी ‘नॅशनल सिक्युरीटी गार्ड’ च्या धर्तीवर फोर्सवनची स्थापना केली होती.
१० वर्षांत १६८ पोलिसांच्या आत्महत्या
मुंबई पोलीस दलात पोलिसांच्या आत्महत्येचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या रिपोर्टनुसार गेल्या दहा वर्षांत मुंबई पोलीस दलातील १८८ पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. २००२ ते २०१२ या वर्षांत मुंबई पोलिस दलातील विविध कर्मचारी आणि पोलिसांनी या आत्महत्या केल्या आहेत. तर गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल २०० पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. देशातील इतर प्रमुख राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पोलिसांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.
वर्ष -संख्या- २००६- ४५; २००७- ३९;
 २००८-३६; २००९- २३; २०१०- ३०; २०११-२७.ं
१३४१ पोलिसांचा मृत्यू
 २००२ ते २०१२ या वर्षांत मुंबई पोलीस दलातले १३४२ पोलीस विविध कारणांनी मरण पावल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ३३ टक्के मृत्यू हे हृदयविकाराने तर ४५ टक्के मृत्यू हे कामाच्या ताणातून आलेल्या विविध आजारांनी झाले होते. परंतु सर्वात धक्कादायक म्हणजे १२ टक्के मृत्यू हे पोलिसांनी आत्महत्या केल्याने झाले आहेत.
पोलिसांच्या अलीकडे केलेल्या आत्महत्यांची माहिती
१. बाळकृष्ण गायकवाड (४०) यांनी १५ एप्रिल २०१३ रोजी चुनाभट्टी येथे राहत्या घरात रॉकेल ओतून जाळून घेतले. कारण तीन लग्ने केली होती. विभागीय चौकशी सुरू होती. त्यातून निर्माण झालेल्या तणावातून आत्महत्या केली होती.
२. दशरथ राणे (४०) यांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये हाजीअली येथील पोलीस वसाहतीतील प्रेयसी शर्वरी खान (४५) हिची गोळी झाडून हत्या व नंतर आत्महत्या. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून आत्महत्या.
३. संजय बॅनर्जी या एटीएस पथकातील अधिकाऱ्याने ठाणे येथे गोळी झाडून आत्महत्या. कारण अद्याप निश्चित नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 5:02 am

Web Title: cammando suicide in force one
Next Stories
1 अनधिकृत बांधकामांचा कायमचा बंदोबस्त करा !
2 प्राध्यापकांना ५०० कोटींच्या वाटपाचे आदेश, तरीही अरेरावी सुरूच
3 न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली
Just Now!
X