वरळी येथील कॅम्पा कोलामधील एका इमारतीच्या आठव्या मजल्यावरील अनधिकृत ठरलेले आपले घर वाचण्याची शक्यता धूसर बनल्यानंतर गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी अखेर सोमवारी मौन सोडले आणि कॅम्पा कोलावासीयांसाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले. मात्र, असे असले तरी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणतीही भूमिका घेण्यास मुख्यमंत्री तयार नसल्याने या इमारतींमधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा चालणारच आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी कॅम्पा कोलातील अनधिकृत सदनिकाधारकांवर ७२ तासांमध्ये घर रिकामे करण्याची नोटीस बजावली.  कॅम्पा कोलामधील इशा-एकता इमारतीच्या आठव्या मजल्यावरील आपली ८०२ क्रमांकाची सदनिकाही अनधिकृत ठरल्यामुळे अखेर लता मंगेशकर यांनी मौन सोडले.
इतर रहिवाशांप्रमाणे लता मंगेशकर यांच्यावरही पालिका अधिकाऱ्यांनी अनधिकृत घर ७२ तासांमध्ये रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. इशा-एकतामधील लता मंगेशकर यांच्या सदनिकेमध्ये त्यांचा भाचा आदिनाथ वास्तव्यास आहे. कॅम्पा कोलातील रहिवाशांची लढाई सुरू असताना मात्र लता मंगेशकर यांनी मौन बाळगले होते. मात्र पालिकेची नोटीस मिळताच मंगेशकर यांनी मौन सोडून ट्विटरच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले.

लता मंगेशकरांचे ट्विट
गेल्या अनेक दिवसांच्या तणावामुळे कॅम्पा कोलातील तिघांचा मृत्यू झाला. येथील घरे पाडल्यास आबालवृद्ध बेघर होतील. बिल्डरच्या चुकीमुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हा अन्याय आहे, एवढेच मला सांगावयाचे आहे, असे लता मंगेशकर यांनी ट्विट केले आहे.