‘कॅम्पाकोला’ कंपाऊंडमधील इमारतींचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून गुरुवारी सकाळी ११ वाजता ही कारवाई सुरू होणार आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याची ही कारवाई तीन टप्प्यांमध्ये केली जाणार असून बांधकाम पाडण्याचा सर्व खर्च संबंधित बिल्डरकडून वसूल केला जाणार आहे.
‘कॅम्पाकोला’प्रकरणी सात इमारतींमधील ३५ मजल्यांवरील १४० घरे अनधिकृत असल्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तशी नोटीस महापालिकेने या इमारतींना पाठविली आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या जी-उत्तर, जी-दक्षिण, एफ-उत्तर आणि एफ-दक्षिण विभागाच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाला सज्ज राहण्यास सांगितले आहे. बांधकाम पाडण्याची कारवाई तीन टप्प्यांमध्ये होणार असून पहिला टप्पा १५ दिवसांचा आहे. दुसरा आणि तिसरा टप्पा अनुक्रमे तीन आणि सहा महिन्यांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेले दोन दिवस पुरेसे पोलीस संरक्षण मिळाले नसल्यामुळे ही कारवाई लांबणीवर पडली होती. ‘कॅम्पाकोला’प्रकरणीच्या कारवाईसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळावा, असे पत्र महापालिका प्रशासनाकडून बृहन्मुबंई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. गुरुवारी या कारवाईसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध होईल आणि अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली जाईल, असा विश्वासही या सूत्रांनी व्यक्त केला.