मुंबईतील वरळी भागात असणाऱ्या कॅम्पाकोला इमारतीवर येत्या ३१मे रोजी हातोडा पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला इमारतीला संरक्षण देण्याबाबतची याचिका फेटाळल्यानंतर येथील रहिवाश्यांच्या उरल्यासुरल्या आशासुद्धा संपुष्टात आल्या आहेत. मात्र आता अखेरचा प्रयत्न म्हणून कॅम्पाकोला रहिवासी संघटननेने थेट राष्ट्रपतींना साकडे घालण्याचे ठरविले आहे. यासाठी राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या दया याचिकेत मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी अशाप्रकारची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याला परवानगी दिल्याचे कॅम्पाकोला रहिवासी संघटननेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना याप्रकरणाची तातडीने दखल घेत कॅम्पाकोलावरील मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या कारवाईपासून रहिवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी दया याचिकेत करण्यात आली आहे.