मराठी शाळांची घसरत चाललेली गुणवत्ता आणि या शाळांमधून शिकणाऱ्या बालकांना इंग्रजी नीट येत नाही असा पालकांमध्ये पसरलेला गैरसमज यामुळे मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. यासाठी चला मराठी शाळांचे संवर्धन करूया हे ब्रीदवाक्य घेऊन मराठी शाळा शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी व संघटना यांनी पुढाकार घेऊन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची आखणी कशी असावी, यासाठीची बैठक रविवारी १६ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.

इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे दिवसेंदिवस मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. तसेच पालक ही इंग्रजी शाळांकडे मोठय़ा प्रमाणात पसंती देत आहेत. परंतु बहुतांश इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा सक्षम नसते आणि मातृभाषेमधून शिक्षण न मिळाल्यामुळे मातृभाषाही सक्षम नसते. त्यामुळे हे विद्यार्थ्यांना कोणत्याच भाषेवर नीट प्रभुत्व प्राप्त करता येत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांची अशी फरफट होण्यापेक्षा मातृभाषेतून शिक्षण दिले तर त्यांचा शैक्षणिक विकासाचा दर्जा वाढू शकतो, असे मत असणाऱ्या काही मराठी शाळेतील शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी मिळून मराठी शाळांच्या संवर्धनासाठी मोहीम सुरू केली आहे. मराठी शाळांची गुणवत्तावाढ आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी कोणते उपक्रम हाती घेता येतील याच्या चर्चेसाठीची बैठक रविवारी दुपारी ४ ते ७ या वेळेत गोरेगाव येथील अ. भि. गोरेगावकर शाळेमध्ये आयोजित करण्यात आली आहे.