उच्च न्यायालय लवकरच मुद्दा निकाली काढणार 

पारंपरिक वा लोकगीते नव्या साजात सादर करणे हे स्वामित्त्व हक्कांचे उल्लंघन ठरू शकते का? त्यासाठी फौजदारी कारवाई केली जाऊ शकते का? मूळात अशा गीतांवर स्वामित्त्व हक्क सांगितला जाऊ शकतो का? असा प्रश्न उच्च न्यायालयाने गुरूवारी उपस्थित केला. तसेच हा मुद्दा लवकरच निकाली काढण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

स्वामित्त्व हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुजराती- मारवाडी गाणी लिहिणारे प्रमोद सूर्या तसेच त्यांची ही गाणी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करणारे प्रकाशक पुखराज सूर्या आणि हितेन पटेल यांच्यावर मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी या तिघांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेनुसार, गुजराती आणि मारवाडी लोकगीतांचा एकत्रित अल्बम प्रमोद यांनी तयार केला होता. त्यांची ही गाणी विवाह सोहळे तसेच इतर समारंभातही वाजवली जातात. त्यांच्या या गाण्यांचा समावेश असलेले पुस्तक पुखराज आणि हितेन यांनी प्रसिद्ध केले. मात्र डिसेंबर २०१४ मध्ये आशादेवी सोनीगाडा नावाच्या महिलेने या तिघांविरोधात स्वामित्त्व हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली. तसेच याच गाण्यांचा समावेश असलेल्या आपल्या एका पुस्तकातून या तिघांनी ही गाणी चोरल्याचा आरोप केला.

गुरूवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजू थोडक्यात ऐकल्यानंतर पारंपरिक वा लोकगीतांवर स्वामित्त्व हक्क सांगता येऊ शकतो का, अशी विचारणा न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने केली. तसेच ही गाणी तर पिढय़ान् पिढय़ा लग्न सोहळ्यात, अन्य समारंभात वाजवली आणि गायली जात आहेत, मग त्यावर कुणी स्वामित्त्व हक्क कसा काय सांगू शकतो? असा सवालही न्यायालयाने केला. किंबहुना असा दावा करणे म्हणजे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ कुणीही गाऊ नये वा ती नव्या साजात सादर करू नये, असे म्हणण्यासारखा प्रकार असल्याची टिपण्णीसुद्धा न्यायालयाने केली. हे मुद्दे निकाली निघण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट करताना न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली. त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांवर आरोपपत्र दाखल न करण्याचे आदेशही पोलिसांना दिले.