लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्याचे काही धोरण आहे का, ही प्रक्रिया सोपी करता येईल का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली. तसेच ७५ वर्षांहून अधिक वयाचे नागरिक आणि विविध शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींची अडचण लक्षात घेऊन घरोघरी जाऊन त्यांचे लसीकरण करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले.

धृती कपाडिया आणि कुणाल तिवारी या वकिलांनी याप्रकरणी जनहित याचिका केली आहे. ७५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाचे आणि शारीरिक व्यंग असलेल्या, अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी अडचणी येत आहेत. शिवाय लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणेही या व्यक्तींसाठी शक्य नाही. ही स्थिती लक्षात घेता अशा नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.