बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात आलेला अंगठय़ाचा ठसा प्रत्येक वेळी जुळत नसल्याच्या कारणास्तव नोकरी नाकारण्याच्या रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात २७ वर्षांच्या तरुणाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ऋुतूमानातील बदलामुळे अक्षय सपकाळ या २७ वर्षांच्या तरुणाच्या तळहाताची त्वचा निघून जाते. परिणामी बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात आलेला अंगठय़ाचा ठसा प्रत्येक वेळी मूळ ठशाशी जुळत नाही. या कारणास्तव रिझव्‍‌र्ह बँकेने सहाय्यक म्हणून अक्षयची केलेली नियुक्ती रद्द केली. या निर्णयाविरोधात त्याने अ‍ॅड्. आशिष गिरी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सहाय्यक पदासाठी २०१६ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे घेण्यात आलेल्या प्राथमिक ऑनलाईन परीक्षेत अक्षय उत्तीर्ण झाला होता. मुख्य लेखी परीक्षेसाठी केंद्रावर प्रवेश देण्याआधी प्रत्येक उमेदवारांना बायोमेट्रिक पद्धतीने अंगठय़ाचा ठसा देण्यास सांगितले जाते. छायाचित्रही काढले जाते. परीक्षेनंतरही उमेदवारांना पुन्हा बायोमेट्रिक पद्धतीने अंगठय़ाचा ठसा देण्यास सांगण्यात आले. त्या वेळी अक्षयच्या अंगठय़ाचा ठसा आधीच्या ठशाशी जुळला नाही. यामागील कारण अक्षयने अधिकाऱ्यांना समजावून सांगितले. शिवाय शाई लावलेल्या अंगठय़ाचा ठसाही दिला. त्यानंतर भाषा प्राविण्याच्या परीक्षेतही तो उत्तीर्ण झाला. या वेळीही त्याच्या अंगठय़ाचा ठसा घेण्यात आला होता.

‘बनावट उमेदवार नाही’

न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि नायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली असता, सपकाळ याने बनावट उमेदवार उभा केला नसल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. असा दावा आपणही करू शकत नाही, असे रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे अ‍ॅड्. व्यंकटेश धोंड यांनी स्पष्ट केले. त्यावर अक्षयने आतापर्यंत बायोमेट्रिक पद्धतीने दिलेले अंगठय़ाचे ठसे, छायाचित्रे या सगळ्यांची तपासणी करण्याचे आणि त्याआधारे परीक्षा दिल्या होत्या की नाही हे पाहण्याचे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेला न्यायालयाने दिले.