मुंबई : करोना रुग्णांची संख्या घटत नाही तोपर्यंत सर्व मोठ्या रुग्णालयांतील करोना रुग्णसेवेव्यतिरिक्त इतर उपचार, वैद्यकीय कामे कमी  करण्याची सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांना दिली असून वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळावरील ताण वाढू लागला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही आता रद्द करण्यात आल्या आहेत. सबळ कारणाशिवाय रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा अथवा अन्य कोणतीही दीर्घकालीन रजा मंजूर करू नये, वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांनाही उन्हाळी सुट्टी देऊ नये, असे पालिकेने  रुग्णालयांना पाठवलेल्या परिपत्रकात नमूद के ले आहे. त्याशिवाय छोट्या रुग्णालयांनी अनावश्यक कारणांसाठी रुग्णांना मोठ्या रुग्णालयात पाठवू नये. करोनाव्यतिरिक्त इतर उपचार कामे काही प्रमाणात कमी करण्यात यावी अशाही सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

रुग्णालयांचे आणि करोना केंद्रांचे अधीक्षक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक यांना परिपत्रकाद्वारे ही सूचना देण्यात आली आहे.