‘मुंबई चोवीस तास’चा प्रयोग २६ जानेवारीपासून सुरू होणार असून मद्यविक्रीवरील बंधने मात्र कायम आहेत. रात्री दीडनंतर मद्यविक्री केल्यास बारचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द करण्यात येणार आहे. तर मॉलसाठी चोवीस तास खुले राहण्याची परवानगी काढून टाकली जाणार आहे. मुंबई चोवीस ताससाठी पालिकेने नियमावली तयार केली असून त्यात हे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई चोवीस तास या संकल्पनेवरून अद्याप सर्व यंत्रणांमध्ये, ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या संकल्पनेबाबत सुस्पष्टता यावी याकरिता पालिकेने नियमावली तयार करून जाहीर केली आहे. पालिकेतील साहाय्यक आयुक्त आणि मुंबई चोवीस तास संकल्पनेचे नोडल ऑफिसर शरद उघडे यांनी ही नियमावली तयार केली आहे.

पोलीस विभाग, पालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या जबाबदाऱ्या, तसेच मॉल व मिल आणि थिएटर मालक यांच्या जबाबदाऱ्या काय असतील याबाबत ही नियमावली आहे.

मुंबई चोवीस तास संकल्पनेमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील व पर्यटन वाढीस चालना मिळेल हा मुख्य हेतू आहे.

मद्यविक्रीवरील सध्या असलेली बंधने मात्र कायम राहणार असून मद्य मागवण्याची परवानगी मध्यरात्री १ वाजण्यापूर्वी द्यावी असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. आम्ही दीडनंतर मद्य विकत नाही, असे शपथपत्र बार मालकांना राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावे लागणार आहे, तशी जाहीर नोटीस बारच्या दर्शनी भागातही लावावी लागणार आहे.

नियमावलीतील काही ठळक वैशिष्टय़े

* मुंबई चोवीस तास संकल्पनेत सुरुवातीला मॉल, मिल कंपाउंड अशा स्वतंत्र प्रवेशद्वार असलेल्या अस्थापनांतील दुकाने व उपाहारगृह २४ तास खुली ठेवता येणार आहेत.

* दुकानदारांच्या इच्छेनुसार दररोज चोवीस तासांऐवजी रात्री उशिरापर्यंत किंवा फक्त शनिवार, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी, सणाच्या दिवशी चोवीस तास दुकान सुरू ठेवता येईल.

* मॉल मालकांना जाहिरात करून सगळ्यांना समान बोधचिन्ह वापरून ग्राहकांना आकर्षित करता येणार आहे.

* मॉलमध्ये लाइव्ह संगीत कार्यक्रम करता येतील, मात्र त्याकरता तिकीट विक्री करता येणार नाही.

* लोकांनी या संकल्पनेचा लाभ घ्यावा म्हणून खरेदीवर सूट देता येईल.

* रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांना अधिक मोबदला देता येईल.

* उपाहारगृहांना खाद्य महोत्सव भरवता येतील.