दहा उपायुक्तांच्या बदल्या रद्द; शिवसेना-राष्ट्रवादीतील विसंवाद उघड

आयुक्तालयांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या अधिकारानुसार मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तीन दिवसांपूर्वी के लेल्या दहा उपायुक्तांच्या बदल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाराजीनंतर रद्द करण्याची नामुष्की मुंबई पोलिसांवर आली. टाळेबंदीत वाढ, प्रवासावर निर्बंध यापाठोपाठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्दयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील विसंवाद अधिकच वाढू लागल्याचे चित्र आहे.

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या हा विषय अतिशय संवेदनशील मानला जातो. त्यातही मोक्याच्या नियुक्त्यांमध्ये राज्यकर्त्यांना अधिक रस असतो. करोनाच्या संकटामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर यंदा निर्बंध आणले गेले. सरसकट बदल्या करण्यापेक्षा आवश्यक तेवढय़ाच बदल्या कराव्यात, असे आदेश सरकारने सर्व विभागांना दिले होते.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दहा उपायुक्तांच्या शहरातच बदल्या केल्या. वास्तविक आयुक्तालयातंर्गत बदल्यांचे अधिकार आयुक्तांनाच असतात. पण, त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफू स सुरू झाली. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह विभागाने बदल्यांचा विषय फारच ताणून धरला. शेवटी मुंबई पोलिसांनी सर्व दहाही बदल्या रद्द करण्यात येत असल्याचे परिपत्रकच काढले. पदभार सोडला असला तरी जुन्याच पदावर रुजू व्हा, असा आदेश या उपायुक्तांना देण्यात आला.

पोलीस आयुक्त सिंग हे ‘मातोश्री’च्या अधिक जवळ गेल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढल्याचे गेल्या आठवडय़ातच दिसत होते. गेल्या आठवडय़ात मुंबईत फिरण्यासाठी दोन किमी परिघाची अट घालण्यात आली आणि आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हजारो वाहने जप्त करण्यात आली. यावरून बरीच टीका झाली. या निर्णयाची गृहमंत्री अनिल देशमुख यांना पूर्वकल्पना दिली नव्हती. यावरून गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर खरेदीसाठी घराजवळ जा, असा सल्ला पोलीस आयुक्तांनी समाजमाध्यमांतून दिला होता. दोन किमी परिघाची अट रद्द करण्याचा आदेश दिल्याचे गृहमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यापाठोपाठ उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यास भाग पाडून राष्ट्रवादीकडील गृह विभागाने पोलीस आयुक्तांना आणखी एक धक्का दिला आहे.

पोलीस दलाचा कारभार गृह विभागाशी सल्लामसलत करूनच झाला पाहिजे, असा स्पष्ट संदेश राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दिला आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन टाळेबंदीत वाढ करणे आणि प्रवासावरील निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त करीत सरकारमधील मित्रपक्षांना विश्वासात घेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

आयुक्तांच्या अधिकारांचा संकोच

पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी बदल्या झाल्यावरच पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बदल्या के ल्या जातात. म्हणजेच बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जाते किंवा विद्यमान अधिकाऱ्यांची इतरत्र बदली केली जाते. राज्यव्यापी बदल्या होण्यापूर्वीच आयुक्त सिंग यांनी उपायुक्तांच्या बदल्या केल्याने मुंबई पोलिसांत अस्वस्थता पसरली. त्यातून काही जणांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे तक्रोर केली होती. वास्तविक उपायुक्तांच्या बदल्यांचा अधिकार पूर्वापार आयुक्तांकडेच होता. पण युती सरकारच्या काळापासून मुंबईत विभागनिहाय बदल्यांचे आदेश निघू लागले. (उदा. झोन -२ असा आदेश निघू लागला.) यातून पोलीस आयुक्तांच्या अधिकाराचा संकोच करण्यात आल्याची चर्चा आहे.

शिवसेनेला सूचक इशारा

गृहखात्यात हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असा सूचक इशाराच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्येही गृह, वित्त, जलसंपदा आदी महत्त्वाच्या खात्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप राष्ट्रवादीच्या नेत्यांना खपत नसे. आताही शिवसेनेबाबत तेच धोरण असल्याचे दिसते. आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही, असा सूचक इशाराच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे.

ही पहिलीच वेळ

पोलीस आयुक्तांनी के लेल्या बदल्या सरकारने तडकाफडकी रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी प्रतिक्रिया काही आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. बदल्या रद्द किंवा स्थगित होतात, पण त्यासाठीची प्रक्रि या आहे आणि ती पूर्ण करण्यात जास्तीतजास्त सहा महिने जातात, याकडे एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या अंतर्गत बदल्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच स्थगिती दिली आहे.

– अनिल देशमुख, गृहमंत्री

पोलीस आयुक्त ‘मातोश्री’वर

पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी रविवारी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याचा तपशील समजू शकला नाही. मात्र, बदल्या रद्द करण्यात आल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील विसंवाद अधोरेखित झाला असताना ही भेट महत्त्वाची मानली जाते.