बरे होण्याच्या जिद्दीने दोन वर्षे कर्करोगाला झुंज दिली..साक्षात मृत्यूला मात देत कर्करोगावर विजय मिळवला आणि महालक्ष्मीचे दर्शन घेऊन देवाचे आभारही मानले. पण नियतीने काहीतरीच वेगळेच नियोजले होते. दर्शन घेऊन परततानाच रेल्वे अपघाताच्या रुपाने मृत्यूने त्यांना गाठले..
‘मरण अटळ आहे’ हे जीवनाचे कटू सत्य सिद्ध करणारी पश्चिम बंगालमधील अरुणकुमार धर यांची ही शोकांतिका मन हेलावून सोडणारी आहे. प. बंगालच्या मालदामध्ये राहणारे अरुणकुमार धर (४६) हे कर्करोगाने आजारी होते. मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेली दोन वर्षे ते उपचारासाठी मालदाहून मुंबईला यायचे. नुकतीच त्यांच्यावर शेवटची शस्त्रक्रिया झाली आणि त्यांचा कर्करोग पूर्णपणे बरा झाला.
साक्षात मृत्यूला मात दिल्याने धर कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी धर हे पत्नी व दोन मुलींसह मुंबईत महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आले. महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळच्या गाडीने ते पुन्हा मालद्याला परतणार होते. दर्शन आटोपून हे कुटुंब सकाळी साडेआठच्या सुमारास महालक्ष्मी स्थानकात परत आले व बोरिवलीला जाणारी लोकल पकडली. सकाळची गर्दीची वेळ आणि लोकलची सवय नसल्याने त्यांनी पत्नी व दोन्ही मुलींना घाईघाईत गाडीत चढवले पण तेवढय़ात गाडी सुरू झाली. धावतधावत गाडी पकडण्याच्या प्रयत्नात धर यांचा तोल गेला व ते रेल्वे व फलाटामधील ‘गॅप’मधून पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

पत्नी, मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न
आपले पती रेल्वे स्थानकातच मागे राहिले एवढेच धर यांच्या पत्नीने पाहिले होते.  त्यामुळे त्या मुलींसह पुढच्याच स्थानकात उतरल्या व पुन्हा महालक्ष्मी स्थानकात परतल्या. परंतु येथे त्यांना धर यांचा निष्प्राण देह दृष्टीस पडला.
हा आघात सहन न झाल्याने त्यांनी दोन्ही मुलींना घेऊन रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी व प्रवाशांनी त्यांना रोखले, अशी माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिवेदी यांनी दिली.
धर यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला असून त्यांचा मृतदेह पश्चिम बंगालमधील गावी पाठविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्रिवेदी यांनी सांगितले.