संदीप आचार्य

मुंबई: मुंबईतील सगळी आरोग्य व्यवस्था आज करोनाच्या युद्धात उतरली आहे. अशावेळी सामान्य रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत. त्यातही कर्करोग रुग्णांचे हाल खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत.  करोनाच्या युद्धातही शेकडो कर्करुग्णांसाठी माझगाव येथील प्रिन्स अलीखान रुग्णालय एकहाती लढा देत आहे.

दररोज कर्करोग रुग्णांचे लोंढे प्रिन्स अलीखान रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. करोनाच्या युद्धामुळे कॅन्सर रुग्णांच्या पुढे ढकलेल्या शस्त्रक्रिया आता जर सुरु केल्या नाहीत तर करोनापेक्षा कॅन्सरने मृत्यू पावलेल्यांची संख्या जास्त दिसेल असा इशारा अनेक कॅन्सर तज्ज्ञांनी दिला आहे. बहुतेक मोठी रुग्णालये एकतर बंद तरी आहेत किंवा काही प्रमाणात सुरू आहेत. बहुतेक नर्सिंग होम्स आजही बंद असल्याचा मोठा फटका केमोथेरपी घेणाऱ्या कर्करुग्णांना बसत आहे. करोनाच्या सुरुवातीला परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयानेही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता बहुतेक पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलून टाटा कॅन्सर रुग्णालयात करोना रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरु केला होता.

राज्यातीलच नव्हे तर देशातील बहुतेक कॅन्सर रुग्णालयांनी पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याचा मोठा फटका कर्करुग्णांना बसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर ७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या प्रिन्स अलीखान रुग्णालयाने सर्व शक्ती कर्करुग्णांवरील उपचारासाठी लावली आहे. डॉ सुलतान प्रधान यांच्यासारखे ऋषितुल्य डॉक्टर वयाच्या ७६ व्या वर्षीही त्यांच्या टिमसह दररोज जवळपास पंधरा ते वीस शस्त्रक्रिया करतात तर ६८ वर्षांचे डॉ तपन सैकिया तेवढ्याच कर्करुग्णांवर केमोथेरपीचे उपचार करत असल्याचे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय ओक यांनी सांगितले.

प्रामुख्याने महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया वेळेत झाल्यास कर्करोगातून बाहेर येण्यास मोठी मदत होऊ शकते. केमोथेरपीच्या रुग्णांचीही अशीच परिस्थिती असून कॅन्सर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत तर करोनापेक्षा कॅन्सरचे मृत्यू जास्त दिसतील अशी भीती डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली. १५२ खाटांचे प्रिन्स अलीखान रुग्णालय तसे नागरी वस्तीत असल्याने व रुग्णालय एका सरळ इमारतीत असल्यामुळे केवळ करोना रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे शक्य नाही. मात्र काही कॅन्सर रुग्णांना करोना झाला तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयातील तिसरा मजला कॅन्सर असलेल्या करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचे डॉ ओक यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या डायमंड ज्युबिली शाळेतही संस्थात्मक क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसं पाहिले तर अन्य आजारांवरही येथे उपचार केले जातात मात्र महिन्याकाठी देशभरातून येणाऱ्या सुमारे तीन हजार कर्करोग रुग्णांसाठी आज प्रिन्स अलीखान रुग्णालय आधार बनून आहे.